Details
पेरू फळपिकाची घनपद्धतीने लागवड करण्याकडे सध्या भर दिला जात आहे, त्यामुळे पेरू लागवडीबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊ. डॉ. बाबासाहेब बडे, सुनील चाळक जमीन - पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी. जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ७.५ या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन टाळावी. लागवड - १) पारंपरिक पद्धत : जमिनीची आखणी करून ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५ ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि माती या मिश्रणाने भरून घ्यावेत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. २) घन लागवड या पद्धतीत ३ x २ मीटर अंतरावर ५० x ५० x ५० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. यामध्ये साधारणतः ५ ते १० किलो कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २.५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, २५ ग्रॅम पीएसबी, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा भुकटी, ५ ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि पोयटा माती यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाने खड्डे भरून रोपांची लागवड करावी. जाती १) सरदार (लखनऊ - ४९) या जातीच्या पेरूची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फळांचे सरासरी वजन २०० ते २५० ग्रॅम असून, रंग पिवळसर हिरवा असतो. फळ आकाराने मध्यम गोलाकार असून, गर पांढरा व गोड असतो. यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण सरासरी १२ ते १४ टक्के असते. या जातीपासून प्रतिहेक्टरी पारंपरिक पद्धतीत २० ते २५ टन, तर घन बाग लागवडीपासून ४० ते ४५ टन उत्पादन घेता येते. २) ललित : मिडो - आॅर्चर्ड (सघन लागवड) पद्धतीच्या लागवडीसाठी उपयुक्त, उच्च उत्पादनक्षम व मोठ्या क्षेत्रावर लागवड असलेली. छाटणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. लालसर पिवळ्या रंगाची फळे. आतील गर घट्ट व गुलाबी रंगाचा असतो. प्रतिझाड १ क्विंटल उत्पादनाची क्षमता. साखरेचे प्रमाण १२ टक्के, फळाचे सरासरी वजन १८५ ते २०० ग्रॅम. ललित या वाणासाठी संपर्क : केंद्रीय अर्धउष्ण कटिबंधीय फलोत्पादन संस्था, रेहमानखेरा, लखनऊ. ९१- ०५२२- २८४१०२२, २३ डॉ. बाबासाहेब बडे, ९४२३०५०४५८ (राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)