बियाणे पेरताना काळजी घ्या....



, बियाणे पेरताना काळजी घ्या....




Details


१) पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. २) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. ३) बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल. सदोष बियाणे - १) ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीबरोबर जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. २) यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे. ३) त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहेत, असे समजावे. ४) सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच त्या बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध नाहीत, असे म्हणतात. ४) शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाणाची निवड करावी, कारण जरी बियाणे शुद्ध असले, तरी वातावरणातील बदलामुळेदेखील काहीवेळा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतकरी असे बियाणे सदोष असल्याचे समजतात. बियाणे सदोष आढळल्यास घ्यावयाची काळजी - १) बियाणे साधारणतः ५ ते ७ दिवसांत उगवते. यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करावे. बियाण्याची उगवण कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची बियाणे निरीक्षणे, पंचायत समिती यांना तपासणी करणेबाबत समक्ष सांगावे. २) बियाण्यामध्ये अनुवांशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी. ३) तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची सत्यप्रत जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच कणसात दाणे न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते. ४) बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता / उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. ५) शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठित केलेली आहे. यामध्ये कृषी विकास अधिकारी, बीज प्रमाणीकरण अधिकारी, बियाणे महामंडळाचा प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असतो. ही समिती आगाऊ नोटीसद्वारे बाधित बियाणे क्षेत्रास केव्हा पाहणी करणार त्याची माहिती देत असतात. ६) शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात शुद्ध बियाणे मिळावे, कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, खरीप हंगाम तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक, यांसारख्या समित्या गठित करण्यात येतात. ७) प्रत्येक तालुक्यात गुणनियंत्रण निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात येतात. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत बियाणे समाविष्ट असल्यामुळे बियाण्याची साठेबाजी करणे, चढ्या भावाने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. जर शेतकऱ्यास याबाबत तक्रार असल्या कृषी अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे लेखी तक्रार करू शकतात. चौकशी समितीस माहिती देण्यासाठी तयारी - १) शेतकऱ्यांनी पेरणीची तारीख, पेरणीची पद्धत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी किती बियाणे वापरले, पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर पावसाचे प्रमाण काय होते किंवा पिकास किती पाणी दिले, कोणत्या प्रकारे दिले, यापूर्वी कोणते पीक घेतले होते, नांगे भरण्यासाठी बी वापरले असल्यास कोणते बी वापरले आणि पीक संरक्षण केल्यास रोग, कीड नियंत्रणासाठी कोणते कीडनाशक वापरले या सर्व बारीक-सारीक गोष्टींची माहिती तयार ठेवावी. जेणेकरून चौकशी समितीस त्यांचे निर्णय घेणे सुलभ होते. २) बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त आहे, असा अहवाल प्राप्त झाल्यावर ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी सातबारा उताऱ्यावर नोंद, गाव पंचनामा, फोटोग्राफ, बियाणे खरेदीपासून ते काढणीपर्यंतच्या मशागतीचा प्रकार, पीक संरक्षण, रासायनिक खतांचा वापर व खर्चाचा सविस्तर तपशील असणे आवश्यक आहे. ३) शक्यतो बियाणे खरेदी पावती शेती ज्याच्या नावे असेल त्या शेतकऱ्यांच्या नावाने घ्यावी. पावतीवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव असावे. संपर्क - डॉ. विजय शेलार - ७५८८६०४२५२ (बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS