Details
कॅनोपी शंभर टक्के झाल्यानंतर रोगांचे नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. या काळात भुरीचा प्रादुर्भावही वाढत असतो. योग्य प्रकारे उपाययोजना केल्यास द्राक्षामध्ये उर्वरित अंशाची समस्या टाळतानाच पिकाचे संरक्षणही साधता येईल. डॉ. एस. डी. सावंत, डॉ. इंदू सावंत १०० टक्के कॅनॉपी झाल्यानंतरचे रोग नियंत्रण : सर्वसाधारणपणे फळांच्या सेटिंगनंतर पाऊस नसल्याने केवड्याचा धोका कमी असतो. पाऊस झाल्यास वातावरणातील आर्द्रता वाढते. थंडी सुरू झाल्यानंतर सकाळी दव पडू लागते. अशा स्थितीत घडावर उशिरा येणाऱ्या केवड्याचा (डाऊनी) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या वेळी शक्यतो बुरशीनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा. पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड किंवा फोसेटील ए. एल. हे फवारणीसाठी स्वतंत्रपणे वापरावे. बागेमध्ये जुन्या केवड्याचा प्रादुर्भाव असल्यास या बुरशीनाशकांचे प्रमाण ३ ते ४ ग्रॅम ठेवावे. बागेमध्ये जुना केवडा नसल्यास प्रतिबंधात्मक २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर फवारणीनेही केवड्याचे नियंत्रण मिळू शकते. भुरीच्या नियंत्रणासाठी छाटणीनंतरच्या ५० ते ६० दिवसांपर्यंत सल्फर (८० डब्ल्यूजी) १.५ ते २ ग्रॅम प्रतिलिटर किंवा डिनोकॅप २५ ते ३० मि.लि.प्रति १०० लिटर पाणी या आंतरप्रवाही नसलेल्या बुरशीनाशकांचा वापर जरूर करावा. अशा वापराने ट्रायअझोल गटातील बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली भुरीची बुरशी नियंत्रणात आणता येते. बागेत यापुढेही प्रतिकारशक्ती असलेल्या भुरीच्या बुरशीच्या वाढीस आळा बसतो. डिनोकॅप किंवा सल्फरच्या फवारणीनंतर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगल्या प्रमाणात मिळू शकते. कायटोसॅनच्या फवारणीने पानावर त्यातील घटकाचे सूक्ष्म वलय निर्माण होते. त्यामुळे पानाच्या किंवा मण्याच्या पृष्ठभागावर वाढणाऱ्या भुरीला अडथळा निर्माण होतो. बुरशीनाशकाच्या फवारणींनतर लगेच कायटोसॅन फवारले असल्यास पाऊस किंवा मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या दवामुळे पानावरील बुरशीनाशक धुऊन जात नाही. त्यामुळे बुरशीनाशकाची नियंत्रणक्षमता जास्त वेळ चांगली राहते. कायटाेसॅन वेलीमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढविते. त्यामुळे भुरीची वाढ वेेगाने होत नाही. कायटोसनच्या वलयामध्ये जैविक नियंत्रणासाठी वापरलेले ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटीलस किंवा सुडोमोनास फ्लुरोसन्स हे घटक चांगल्याप्रकारे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे पुढील कुठल्याही वाढीच्या अवस्थेमध्ये जैविक नियंत्रणासाठी फवारणी घेण्याचे नियोजन असल्यास त्या आधी कायटोसॅनची फवारणी जरूर घ्यावी. बुरशीनाशकांचा योग्य वापर अाणि उर्वरित अंश समस्या : छाढणीनंतरच्या ६० ते ८० दिवसांपर्यंतच्या काळात भुरीचा धोका अधिक असलेल्या वेळी फवारणी घ्यावी. ढगाळ वातावरण व वातावरणातील तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्यास भुरीचे बिजाणू वेगाने तयार होतात. बागेमध्ये भुरी वेगाने पसरते. साहजिकच अशा वातावरणामध्ये फवारणी घ्यावी. - जास्त थंडी नसल्यास सल्फर फायदेशीर ठरू शकेल. - थंडी वाढल्यास ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके उदा. टेट्राकोनॅझोल (३.८ इडब्ल्यू ) ०.७५ मि.लि. प्रतिलिटर किंवा मायकोब्युटानील (१० डब्ल्यूपी) ०.४ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारल्यास नियंत्रण चांगले मिळते. छाटणीनंतर ८० दिवसांनंतर फवारलेल्या कुठल्याही बुरशीनाशकाचे उर्वरित अंश काढणीपर्यंत घडामध्ये राहू शकतात. म्हणून छाटणीनंतर ८० दिवसांनंतर कुठल्याही ट्रायअझोल बुरशीनाशकाचा वापर भुरी नियंत्रणासाठी टाळावा. - प्रत्येक बुरशीनाशकाचा पीएचआय बघूनच वापर केल्यास त्याचे उर्वरित अंश एमआरएलपेक्षा कमी निश्चितच येतील. थंडी वाढत असताना... या वर्षी नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वच द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाढत्या फुटीवर रोगाचे नियंत्रण फक्त बुरशीनाशकाने मिळणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर कायटोसॅनचा वापर करून पावसाच्या दिवसात त्यावर ट्रायकोडर्मा किंवा स्युडोमोनास फ्लुरोसन्स किंवा बॅसिलस सबटिलिस यांसारख्या जैविक घटकांसाठी उपयोगी असे सूक्ष्मजीव घटक फवारावेत. त्यामुळे केवळ बुरशीनाशकाने मिळणाऱ्या नियंत्रणापेक्षा या पध्दतीने चांगले रोगनियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सर्व विभागामध्ये हलक्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्या वेळी सकाळी धुके व दव पडण्याची शक्यता आहे. जर बागेतील तापमान दहा अंशांपेक्षा कमी जात असेल तर डाऊनी वाढण्याची शक्यता फार कमी असेल, त्याबरोबर भुरी वाढण्याची शक्यता वाढेल. ॲम्पेलोमायसिस क्विस्कॅलिस ही भुरीच्या बुरशीवर वाढणारी बुरशी आहे. थंडीच्या दिवसामध्ये भुरी वाढल्यास या बुरशीजन्य घटकाची फवारणी २ ते ५ मिली याप्रमाणे बागेत केल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. काढणी आधी शेवटच्या तीस ते चाळीस दिवसांमध्ये बागेमध्ये शक्यतो कोणत्याही बुरशीनाशकांचा वापर करू नका. बागेमध्ये रोग दिसल्यास शक्यतो जैविक नियंत्रणाच्या बुरशी (ट्रायकोडर्मा) किंवा जिवाणूजन्य घटक उदा. बॅसिलिस सबटिलिस यांची फवारणी करावी. अशा फवारणीने मण्यावर व घडावरील भुरीचे नियंत्रण चांगल्या रीतीने होईलच, त्याच बरोबर काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढेल.