Details
सध्याच्या काळात हळदीवर कंद किंवा मूळकूज, पानांवरील ठिपके आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. यामुळे झाडातील हिरवेपणा कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत. डॉ. चारुदत्त ठिपसे कंदकूज किंवा मूळकूज - - रोगग्रस्त कंदापासून या रोगाचा प्रसार होतो. प्रादुर्भावामुळे पानाच्या कडा वाळण्यास सुरवात होते. कालांतराने पूर्ण पान वाळते. - झाडाचा बुंधा ओलसर होऊन नरम पडतो आणि झाड कोलमडते. खोडाचा घाण वास येतो. खोड दाबल्यास त्यातून पाणी बाहेर पडते. - रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कंदावरदेखील बुरशीची वाढ होते, कंद कुजतो. नियंत्रणाचे उपाय - - शेतामध्ये पाणी साचू देऊ नये. - कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा - एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण तयार करावे. (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद आणि १०० लिटर पाणी). त्यातील १०० ते १५० मि.लि. द्रावण रोगग्रस्त भागातील हळदीच्या रोपाच्या मुळाजवळ जिरवावे. पानांवरील ठिपके - - कोलेटोट्रिकम कॅप्सिसी या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव. ओलसर व दमट हवामान रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत. - पानाच्या दोन्ही बाजूंस करडे वलय असलेले व मध्यमभागी राखाडी रंगाचे लांबट ठिपके दिसतात. कालांतराने दोन किंवा अधिक ठिपके एकत्र येऊन मोठे चट्टे पडतात. ठिपक्यांचा मध्यभाग पातळ होतो. पान वाळण्यास सुरवात होते. - जास्त प्रादुर्भाव असल्यास बुंधा आणि कंदावर ठिपके दिसून येतात. काळ्या रंगाची बुरशी आढळून येते. नियंत्रणाचे उपाय - - मॅंन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी. - रोगाचा पुढील प्रसार टाळण्याकरिता रोगग्रस्त झाडाची पाने गोळा करून जाळून टाकावीत. ३) पानांवरील करपा (लीफ ब्लॉच) - - टॅफरिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील वाढती आर्द्रता आणि २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान रोगाच्या प्रसारास पोषक. - एक ते दोन मि.मी. आकाराचे चौकोनी ठिपके एका रांगेत पानांच्या शिरांच्या बाजूने पानांच्या दोन्ही बाजूस आढळतात. पानाच्या वरच्या बाजूस ठिपक्यांचे प्रमाण जास्त असते. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे मोठे डाग पानांवर पडतात. - या पानांवर असलेल्या बुरशीबीजांपासून नवीन पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. नव्या पानांवरील दुय्यम प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. या रोगाचे बीजाणू वाळलेल्या पानांमध्ये पुढील हंगामापर्यंत जिवंत राहतात. नियंत्रणाचे उपाय - - मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी. - रोगाचा पुढील प्रसार टाळण्याकरिता रोगग्रस्त झाडाची पाने गोळा करून जाळून टाकावीत. - कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी. संपर्क - डॉ. चारूदत्त ठिपसे - ८२७५४१२०६२ (विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)