Details
सध्या बहुतेक शेतकऱ्यांची कांदा काढणी पूर्ण झाली असेल. त्यांनी खालील उपाययोजना कराव्यात. १) जोडकांदे, डेंगळे आलेले आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. २) शेतातून काढलेले कांदे साठवणगृहात ठेवण्यापूर्वी सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात आणि वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगकारक सूक्ष्मजीवांचा कांद्यात सहज प्रवेश होत नसल्याने कांदा अधिक काळ टिकतो. ३) तळाशी व बाजूंना हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहामध्ये कांदे साठवावेत. ४) लसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावेत. ५) साठवणीतील कांद्यावर तसेच लसणावर नियमितपणे देखरेख ठेवावी. सडलेले आणि पिचलेले कंद तत्काळ काढून टाकले पाहिजेत. चाळीत हवा खेळती राहील याची योग्य व्यवस्था करावी. खरीप कांद्याच्या रोपवाटिकेचे नियोजन आपण मागील सल्ल्यामध्ये पाहिले. लवकर लावलेल्या खरीप कांद्याकरिता पूर्वमशागत ः १) शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. २) वाफे तयार करण्यापूर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडीखत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. ३) गादी वाफे १५ सें.मी. उंच आणि १२० सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. इतके अंतर ठेवावे. यामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी निघून जाईल. रोपांचे काळा करपा रोगापासूनचे नुकसान कमी होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोईची आहे. ४) ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. ४ लिटर क्षमतेच्या दोन ड्रिपरमधील अंतर ३०-५० सें.मी. असावे. ५) तुषार सिंचनासाठी २० मि.मी. लॅटरल व तासी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावेत. लवकर लावलेल्या खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड ः १) पुनर्लागवडीसाठी खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ३५-४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. २) रोपवाटिकेतून रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. ३) रासायनिक खतांमधून हेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश देणे आवश्यक आहे. माती परिक्षणामध्ये जमिनीतील गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे. गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत हेक्टरी ३० किलो या प्रमाणात गंधक द्यावे. वरील एकूण खत मात्रेपैकी रोपांच्या पुनर्लागवडीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र व स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. ४) ॲझोस्पीरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी ५ किलो प्रति हेक्टर द्याव्यात. यामुळे रोपाकरिता नत्र व स्फुरद यांची उपलब्धता वाढते. ५) रोपांच्या चांगल्या वाढीसाठी पुनर्लागवड व तीन दिवसांनंतर पाणी देण्याची गरज असते. त्यानंतर आवश्यकतेनुसार ७-१० दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. पीक संरक्षण रोपांवर लागवडपूर्व प्रक्रिया ः बुरशीजन्य रोग व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, - १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मि.लि. कार्बोसल्फान प्रति लिटर - पाण्यामध्ये रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. तणनाशकांचा वापर- फवारणीची वेळ- पुनर्लागवडीच्या वेळी. प्रमाण - प्रतिलिटर पाणी - ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.लि. किंवा - पेंडीमिथेलीन (३० टक्के ईसी) ३.५ ते ४ मि.लि. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता ः प्रतिलिटर पाणी मिथोमिल ०.८ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम. - प्रतिबंधात्मक फवारणी. - डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)