कमी खर्चात तयार करा हायड्रोपोनिक्स चारा



, कमी खर्चात तयार करा हायड्रोपोनिक्स चारा




Details


उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात हायड्रोपोनिक्स पद्धतीने वर्षभर चारानिर्मिती करता येते. युनिट निर्मितीसाठी पीव्हीसी पाइपचा (१ इंची आणि ६ किलो दाब क्षमता) वापर करावा. यामुळे कमी खर्चात व तंत्रशुद्ध पद्धतीने हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन करता येते. डॉ. एस. पी. गायकवाड हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारानिर्मितीसाठी आपण लाकूड, बांबू, लोखंडी पाइप, पीव्हीसी पाइपच्या मदतीने युनिट तयार करू शकतो. हे युनिट नंतर ९० टक्के शेडनेटने झाकावे. ज्यांना शेडनेटचा खर्च परवडत नाही, त्यांनी जुने बारदान किंवा जुन्या साड्यांचा वापर करावा. १) सर्वसाधारणपणे या रचनेमध्ये तीन ते चार फूट जागा सोडून दोन्ही बाजूस रॅक तयार करावेत. या रॅकमध्ये पाच कप्पे करावेत. प्रत्येक कप्याची उंची दीड फुटाची असावी. ज्यामुळे स्प्रिंकलरमधून पाणी सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात पोचण्यास मदत होते. तसेच ट्रे ठेवणे सोपे जाते. २) पाणी फवारण्यासाठी स्प्रिंकलर व टायमरचा वापर करता येतो. यामध्ये स्प्रिंकलर चालवण्यासाठी साठ ट्रेसाठी साठ स्प्रिंकलर लागतात. हे चालवण्यासाठी एक एचपीसाठी मोटार लागते. गरजेप्रमाणे पाणी फवारण्यासाठी टायमर लावावा. ज्यांना हा खर्च परवडत नाही त्यांना पाठीवरील पंप किंवा झारीचा वापर करून चाऱ्यावर पाण्याची फवारणी करावी. पीव्हीसी पाइपचे हायड्रोपोनिक चारा उत्पादन तंत्र - १. यू पीव्हीसी पाइप (१ इंची, १० किलो दाब क्षमता) २. प्लम्बिंग पीव्हीसी पाइप (१ इंची, ६ किलो दाब क्षमता) ३. प्लम्बिंग पीव्हीसी पाइप (अर्धा इंची, ६ किलो दाब क्षमता) प्लम्बिंग पीव्हीसी पाइप (१ इंची आणि ६ किलो दाब क्षमता) वापरून कमी खर्चात व तंत्रशुद्ध पद्धतीने हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन युनिटची निर्मिती करता येते. यासाठी खालील साहित्याची आवश्‍यकता आहे. उत्पादनाची पद्धत - १) चारा उत्पादनासाठी गहू, मका, ओट या धान्यांचा वापर करावा. ज्वारी हे पीक हायड्रोपोनिक्स पद्धतीने वापरण्यास योग्य नाही, कारण याच्या कोवळ्या चाऱ्यात हायड्रोसायनाईड हा विषारी घटक असतो. त्यामुळे जनावरास विषबाधा होण्याची शक्यता असते. मका, गहू, ओट बियाणे पाण्यामध्ये बारा तास भिजवत ठेवावे. त्यानंतर सर्वसाधारणपणे २४ ते ३६ तास गोणपाटात बांधून ठेवावे. यामुळे बियाण्याला लहान मोड येतात. २) अंकुरित धान्य प्लॅस्टिक ट्रेमध्ये एका चौरस फुटाला ३५० ग्रॅम (वाळलेल्या धान्याचे वजन) प्रमाणे पसरावे. हे ट्रे एका मांडणीवर ठेवावेत. ३) उत्पादन युनिट शेडनेटने अाच्छादित करावे. ट्रे कोणत्याही आकाराचे असू शकतात, फक्त त्यातून पाणी सर्व ठिकाणी पोचले पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. चारा उत्पादन करताना स्वच्छता ठेवावी. ४) अंकुरित बियाण्यांवर हवामानानुसार ठराविक कालावधीमध्ये पाण्याची फवारणी करावी. यासाठी स्प्रिंकलर व टामयरचा वापर करावा. अशा पद्धतीने सरासरी सात दिवसांत आपणास चांगली वाढ झालेला चारा तयार होतो. ५) हायड्रोपोनिक्स चारा मुळ्यासह जनावरास खाण्यास तयार झालेला असतो. एका किलो धान्यापासून सर्वसाधारणपणे ८ ते १० किलो चारा तयार होतो. ६) एका २ फूट लांब आणि १.५ फूट रुंद ट्रेमधून ८ ते १० किलो चारा तयार होतो. या चाऱ्याबरोबरीने जनावरांना इतर लागणाऱ्या अन्नघटकांची गरज सुका चारा व पशुखाद्यातून पूर्ण करावी. ७) मक्याच्या हाड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी एका किलोसाठी २ ते २.५ रुपये तर गव्हासाठी २.५ ते ३ रुपये खर्च येतो. उत्पादनासाठी लागणारे घटक ट्रे - १) ट्रे चाऱ्याचे वजन पेलणारा असावा. बाजू भक्कम असाव्यात, कारण ट्रेचे पूर्ण वजन बाजूंवर असते. या बाजू रॅकवर टेकलेल्या असतात. २) बियाणे टाकताना ते काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असे न होता ते एकसारखे पसरण्यासाठी ट्रेमध्ये भाग केलेले (रिज) असावेत. यामुळे बियाणे पसरण्याचा अंदाज येतो. ट्रेमधील रीजची उंची अर्ध्या ते एक सेंटिमीटर असावी. यामुळे सर्व बाजूंना एकसारखा पाणीपुरवठा होतो. ३) ट्रेच्या ओळींच्या शेवटी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र ठेवलेली असतात. ही छिद्र शक्यतो ट्रेच्या दोन्ही बाजूंना ठेवल्यास आपण ट्रेची कोणतेही बाजू उताराकडे ठेवू शकतो. बियाणे - १) चारानिर्मितीसाठी मका, गहू, चवळी, ओट यांचा वापर करता येतो. आपल्या भागातील वातावरण व बियाण्यांची उपलब्धता यानुसार बियाणे निवडावे. २) थंड भागामध्ये गहू किंवा ओट आणि उष्ण भागामध्ये मक्याचे उत्पादन चांगले येते. ३) बियाणे स्वच्छ, अंकुरित होणारे असावे. रोगाचा प्रादुर्भाव नसावा. बियाणे प्रक्रिया केलेले नसावे. ४) बऱ्याच वेळेस यंत्राने काढणी केलेल्या मक्याच्या बियाण्यांचा अंकुर व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे असे बियाणे हायड्रोपोनिक्स पद्धतीत उगवत नाही. असे बियाणे पाण्याच्या वापराने कुजते. चाऱ्यास वास येतो. ट्रेमध्ये बुरशी वाढते. सुरवातीस थोडे बियाणे घेऊन, उगवणक्षमता तपासून वापर करावा. पाणी नियोजन - १) पाणी हे पोषणासाठी लागते, परंतु त्याचा वापर येथे तापमान, आर्द्रता व रोग नियंत्रण यासाठी होतो. ३) बऱ्याच ठिकाणी हायड्रोपोनिक्स चारानिर्मितीमध्ये वापरलेले पाणी पुन्हा वापरण्यासाठी एका ठिकाणी संकलित करून गाळले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होते. अशा पाण्याचा पुनर्वापर करताना स्प्रिंकलर वारंवार खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोग नियंत्रण - योग्य गुणवत्तेचे बियाणे, ट्रेची संरचना पाण्याचा योग्य वापर, आर्द्रता, तापमान, चाऱ्याची हाताळणी महत्त्वाची आहे. तापमान नियंत्रण - १) तापमान नियंत्रणासाठी शेडनेट, पाण्याचा वापर, फॉगर्सचा वापर आणि सेंसरचा वापर करावा. २) हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती तंत्रात ९० टक्के सावली व १० टक्के सूर्यप्रकाश नियंत्रित करणारे शेडनेट वापरावे. यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश व कमी सावली असणारे शेडनेट वापरले, तर यामधील मोठ्या छिद्रातून दवबिंदू हवेबरोबर बाहेर जाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आतील तापमान नियंत्रण होण्याचा कालावधी कमी होतो. आर्द्रता - चांगल्या प्रमाणात चारा उत्पादन होण्यासाठी ७० टक्के आर्द्रता फॉगर्सच्या मदतीने नियंत्रित करावी. उत्पादनाचे फायदे - १) साधारणपणे ५० चौरस मीटर जागेमध्ये प्रती दिवस ६०० किलोपेक्षा जास्त पौष्टिक चारा तयार होतो. पारंपरिक पद्धतीने इतका चारा तयार करण्यास साधारणपणे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल. २) पारंपरिक पद्धतीत एक किलो चारा तयार करण्यासाठी सुमारे ८० लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये पाणी पुन्हा पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेत साधारणपणे १.५ लिटर तर पाण्याचा पुन्हा वापर न करता एकदाच वापर करण्याच्या पद्धतीमध्ये २ ते ३ लिटर पाण्याचा वापर होतो. न वापरलेले पाणी आपण बागेसाठीसुद्धा वापरू शकतो. ३) दररोज ६०० किलो मका चारा तयार करण्यासाठी एक कामगार पुरेसा आहे. वर्षभर उत्पादन शक्य आहे. ४) हा चारा पौष्टिक व लुसलुशीत असल्याने चव चांगली असते. जनावरे हा चारा आवडीने खातात. दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावराची रोगप्रतिकार शक्ती, जनावराची त्वचा, गाभण राहण्याचे प्रमाण, जनावरांची चयापचयाची क्रिया सुधारते. ६) नेहमीच्या चाऱ्याला थोडा पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा चांगला वापर करू शकतो. यामधील पाण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असते. ७) दुधाळ जनावरांना त्यांच्या गरजेनुसार पाच किलो ते २५ किलोपर्यंत हायड्रोपोनिक्स चारा द्यावा. त्याचबरोबरीने पूरक सुका चारा आणि खुराक द्यावा लागतो. संपर्क - डॉ. एस. पी. गायकवाड - ०२१६६-२२५१३०२ (सहायक महाव्यवस्थापक (पशुसेवा), गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. फलटण, जि. सातारा)
Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS