Details
सद्यःस्थितीत मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावलेली कांदे बाग व या वर्षी जून-जुलैमध्ये लावलेली नवीन मृगबाग उभी आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लावलेली कांदे बाग ही घड पक्वतेच्या - घड कापणीच्या अवस्थेत आहे, तर जून महिन्यात लागवड केलेली मृगबाग ही जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. मृगबागेची पुढीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच नवीन कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात केली जात असल्याने यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. अ) मृगबाग - - मुख्य खोडानजीक येणारी पिले धारदार विळीने जमिनीलगत दर २ आठवड्यांनी कापावीत. - पावसाचे अतिरिक्त पाणी बागेत साचू नये म्हणून निचऱ्याची व्यवस्था करावी. - फर्टिगेशन - नवीन मृग बागेस फर्टिगेशन करण्यासाठी एक हजार केळी झाडांसाठी प्रती आठवडा तेरा किलो युरिया व साडेआठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे. यासाठी १०० लिटर पाण्यात प्रथम आठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश विरघळावे व त्यानंतर त्यात तेरा किलो युरिया विरघळावा. - गंधक - लागवडीनंतर १६५ दिवसांनी दहा ग्रॅम प्रती झाड बेंटोनाईट सल्फर द्यावे किंवा प्रती झाड पाच ग्रॅम मायक्रोग्रॅन्युलर सल्फर द्यावे. - सूक्ष्म अन्नद्रव्ये - लागवडीनंतर पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रति झाड शेणखतात (१५० ग्रॅम) मुरवून शिफारशीत अन्नद्रव्य मात्रेसह द्यावे. - करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ताबडतोब रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पाने काढून बागेबाहेर नेऊन जाळावीत. झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा २५ ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक चांगल्या प्रतीचे १० मि.ली. स्टीकर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ब) नवीन कांदेबाग - - या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड करावयाच्या कांदेबाग लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून, योग्य अंतरावर खोल सऱ्या पाडाव्यात. लागवडीचे अंतर किमान ५ x ५ फूट इतके ठेवावे. - लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३ ते ४ महिने वयाचे, ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. - भाैतिक संस्कार - बेण्यावरील माती, मुळ्या कोयत्याने काढाव्यात. कंदावर ३-४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. या संस्कारामुळे सुत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होते, शिवाय खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास असे बेणे वेगळे करता येते. - रासायनिक संस्कार - भौतिक संस्कार केलेल्या बेण्यावर रासायनिक संस्कार केल्यास भविष्यात उदभवणाऱ्या सुत्रकृमी आणि सिगाटोका लिफस्पॉट यांपासून संरक्षण मिळते. १०० लिटर पाणी घेऊन त्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० मिली ॲसिफेट टाकावे. ढवळावे आणि त्यात भौतिक संस्कार केलेले बेणे किमान ३० मिनिटे बुडवावे. - ऊतीसंवर्धित रोपे - लागवडीसाठी एकसारख्या वाढीची उतिसंवर्धित रोपे निवडावीत. रोपे ३० ते ४५ सें.मी. उंचीची आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत. लागवडीनंतर प्रतिदिन प्रतिझाड किमान ५ लिटर पाणी द्यावे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रोपाभोवतालची माती पायाने दाबावी. - बागेभोवती चारही दिशांनी गजराज गवत किंवा शेवरीचे सजीव कुंपण लावावे. संपर्क - डॉ. विक्रांत भालेराव, ९४२०६६१२५८ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)