Details
सद्यपरिस्थितीत काही ठिकाणी डाळिंब बागांमध्ये सूत्रकृमी, तेलकट डाग रोग व मर या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. डॉ. सुनील पाटील मुळावर गाठी करणारी सूत्रकृमी : - बहार धरतेवेळी प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळल्यास फोरेट (१०जी) ६५ किलो प्रति हेक्टरी रिंग पद्धतीने झाडाभोवती टाकावे. - जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस किंवा सुडोमोनस फ्ल्युरोसन्स २० किलो प्रति हेक्टर (२.५ टन निंबोळी पेंडमध्ये मिसळून) या प्रमाणात रिंग पद्धतीने झाडाभोवती टाकावे. - इतर अवस्थांतील फळबागांत सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असल्यास फोरेट २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात झाडाभोवती खड्डा करून टाकावे. नंतर झाकून घ्यावे. - दोन झाडांच्या व ओळींच्या मधल्या रिकाम्या जागेत किंवा झाडाभोवती गोल कडेने झेंडू लागवड करावी. त्यामुळे सूत्रकृमींची संख्या कमी होते. झेंडूची अशापद्धतीने ४ ते ५ महिने लागवड केल्यास चांगले निष्कर्ष मिळतात. - बागेत स्वच्छता ठेवावी. रोग : तेलकट डाग नियंत्रणाचे उपाय : - उशिराच्या आंबेबहाराची संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी. - हस्त बहार घेण्यापूर्वी इथेफॉन १ते २ मि. लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून संपूर्ण पानगळ करावी. - रोगट फांद्यांची छाटणी करावी. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत. - बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर किंवा कॉपर डस्ट (४ टक्के) २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात धुरळणी करावी. - खोडाला ब्रोमोपॉल ५० ग्रॅम अधिक कॅप्टन ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात मिश्रण करुन त्याचा मुलामा द्यावा. - नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल २५० पीपीएम (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण १ टक्के किंवा कॅप्टन ०.२५ (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) टक्केची फवारणी करावी. पानावर आणि फळावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशीच फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने चालू ठेवावी. रोग नसेल तर ३० दिवसांचे अंतराने फवारणी करावी. पावसाळी हंगामात रोगाच्या तीव्रतेनुसार ही फवारणी चालू ठेवावी. फळ काढणीच्या २० दिवसांपूर्वी फवारणी बंद करावी. - शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. २. मर रोग नियंत्रणाचे उपाय : - सध्या पावसाळा असल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. - रोगाची लागण दिसून आल्यास ताबडतोब हेक्झाकोनॅझोल १५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २० ग्रॅम अधिक क्लोरपायरीफॉस (०.२० इसी) २५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण बनवून प्रति झाड ५ लिटर याप्रमाणात रिंग पद्धतीने ओतावे. - रोगाची लक्षणे झाडाच्या वेगवेगळ्या भागांवरही दिसून येतात; म्हणून संपूर्ण झाडावर हेक्झाकोनॅझोल १० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. - रोगाने संपूर्ण वाळलेली व मेलेली झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत. अशी रोगट झाडे जाळण्यास नेताना त्यांची रोगट मुळे प्लॅस्टिक पिशवीच्या सहाय्याने झाकून घ्यावी. कारण बुरशीचे बीजाणू मोठ्या प्रमाणावर मुळांमध्ये असल्यामुळे चांगल्या झाडांना रोगाची लागण होते. - झाडांची छाटणी पावसाळ्यात करू नये. कारण हाच किडीचाही अनुकूल कालावधी असतो. किडी या काळात छाटलेल्या भागांमधून निघणाऱ्या पेशीरसाकडे आकर्षित होतात. त्यामुळे बुरशीचा प्रसार होतो. - छाटलेल्या भागांना १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना प्रति १० लिटर पाणी) लगेच लावावी. - रोगासाठी कारणीभूत खोड किडीच्या नियंत्रणासाठी गेरू ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (०.२० ईसी) ५० मि.लि.अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लि. पाणी या प्रमाणात मिसळून झाडाच्या खोडास जमिनीपासून २ फुटांपर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे. गेरू रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी औषधे टाकावीत. - खोडकिडा नियंत्रणासाठी डायक्लोरव्हाॅस १० मि.लि प्रति लिटर पाणी याप्रमाणात मिसळून हे द्रावण छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे सोडावे व छिद्रे बंद करावीत. डॉ. सुनील पाटील, ९४२०५३६९७१ (डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, ता. बागलाण, जि. नाशिक.)