Details
लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड महत्त्वाची आहे. कारण एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंत वापरता येते. सेलम, फुले स्वरूपा, कृष्णा, रोमा, प्रतिभा यांसारख्या जातींची निवड करावी. जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी ताग किंवा धैंचा गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. डॉ. जितेंद्र कदम हळद हे नऊ महिन्यांचे पीक अाहे. याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड सुरू होते. १) हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढत असल्याने एक फूट खोलीमधील मातीचे माती परीक्षण करावे. हळदीचे उत्पादन प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून आहे. २) जमीन ही उत्तम निचरा असणारी निवडावी. कारण हे पीक जमिनीमध्ये आठ ते नऊ महिने राहते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंद कूज लागण्याचा धोका वाढतो. ३) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. ४) जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी ताग किंवा धैंचा गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. ५) भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो लागवडीसाठी टाळाव्यात. ६) माळरानाच्या जमिनीमध्येसुद्धा याची लागवड करता येते; परंतु या जमिनीमध्ये सरासरी उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने सुपीकता वाढविणे आवश्यक आहे. संतुलित प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ७) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम पिवळसर छटा राहते. कारण अन्नद्रव्यांचे ग्रहण या जमिनींमध्ये योग्य प्रकारे होत नाही. ८) हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटीमधील अंतर कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे. ९) जमिनीमधील लव्हाळा, हराळी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत, तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात. त्यानंतर कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळीअगोदर एकरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सध्याच्या काळात शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण यांचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा. १०) जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. बियाणे निवड - लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड महत्त्वाची आहे. कारण एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंत वापरता येते. बियाणे निवडताना - - बियाणे जातिवंत असावे. सेलम, फुले स्वरूपा, कृष्णा, रोमा, प्रतिभा यांसारख्या जातींची निवड करावी. - बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. दीड ते दोन महिने बियाण्याची काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. - बियाणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. बियाण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बियाणे मऊ पडते व असे मऊ पडलेले बियाणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बियाणे उगवत नाही. बीजप्रक्रियेसाठी कीडनाशकात टाकले असता ते वर तरंगते. - मातृकंद बियाणे असल्यास ते त्रिकोणाकृती असावे. - बियाण्यावर एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावे. - बियाण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. बियाण्याचे प्रकार - १) मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे - या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते. मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते. २) बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे - मुख्य रोपाच्या बाजूला जे फुटवे येतात त्याच्या खाली जे कंद तयार होतात त्यास बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते. ३) हळकुंड - ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे. लागवडीसाठी बियाणे तयार करणे - १) लागवडीच्या पूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावर पाणी मारावे, जेणेकरून ढिगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून बियाणे लागवडीस तयार करावे. - हळदीसाठी बेवड म्हणून कंदवर्गीय पिके जशी आले, बटाटा किंवा हळदीवर हळद घेणे शक्यतो टाळावे. हळदीसाठी द्विदलवर्गीय पिके जशी घेवडा, हरभरा, भुईमूग यांसारख्या पिकांचा बेवड चांगला असतो. संपर्क - डॉ. जितेंद्र कदम - ९८२२४४९७८९ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)