AgroInfoData

>>


बिनपाण्याची शेती...महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न

बिनपाण्याची शेती...महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी. नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्हयातील बेनकनहळी गावात राजशेखर निंबर्गी यांची 45 एकर शेती आहे. त्यातून 52 प्रकारचे धान्य, मसाले आणि फळं त्यांना याच शेतीतून मिळतात. कृषी तज्ज्ञही अचंबित होतील एवढं ज्ञान या चौथी पास शेतकऱ्याकडे आहे. निसर्ग शेती प्रत्येकाला शक्य आहे. शेतातल्या टाकाऊ वस्तू शेतातच टाकायच्या. त्यावर अच्छादन टाकायचं. ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. कालांतराने या वस्तू कुजतात आणि त्यातून पाणी तयार होतं. हेच पाणी शोषून घेण्याची ताकद झाडांमध्ये असते. त्यामुळे वातावरणात असलेलं पाणी जमिनीत मुरवणं हे सोपं आहे. या अच्छादनामुळे जमीन कायम हिरवीगार राहू शकते, असं राजशेखर निंबर्गी सांगतात. विजयपूर हा सोलापूरला लागून असलेला जिल्हा. सोलापूरसारखीच दुष्काळी परिस्थिती इथे आहे. धरण, नदी-नाले आणि कालवे अक्षरशः कोरडे ठाक आहेत. त्याच परिसरात राजशेखर निंबर्गी यांची समृद्ध शेती लक्षवेधी ठरते. दर बुधवारी आणि रविवारी निंबर्गी कुटुंबीय दहा हजार लिंबाची तोडणी करतात. म्हणजे महिन्याला 80 हजार लिंबांची तोडणी होते. त्यातून प्रत्येकी दोन रुपयाप्रमाणे त्यांना महिन्याला 1 लाख 60 हजारांचं उत्पन्न मिळतं आणि निंबर्गी त्याला महिन्याचा पगार मानतात. याशिवाय रोपं विक्री, धान्य, फळ, भाजीपाला आणि फळाच्या विक्रीचा हिशेबच वेगळा. मी सुखी आणि समाधानी आहे. दर महिन्याला लाखो रुपये मला मिळतात. मला ना बँकेचं कर्ज आणि ना मी कोणाच देणं लागतो. माझ्याप्रमाणेच अन्य शेतकऱ्यांनीही अशी शेती करावी. ही सगळी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गरज फक्त इछ्याशक्तीची आणि मानसिकता बदलण्याची आहे. शासकीय मदत आणि बँकेच कर्ज न घेता शेतकरी सुखी होऊ शकतो, असा सल्ला राजशेखर निंबर्गी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. कर्नाटक सरकारने सर्वोच्च कृषी पुरस्काराने राजशेखर निंबर्गी यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या या शेतीला देशा-विदेशातून अनेकजण भेट देतात. नैसर्गिक शेती ही जीवनशैली शेतकऱ्याच्या जीवनात शाश्वत स्थैर्य आणू शकते. मी कधी देवाकडे संकट दूर कर म्हणून मागणं मागितलं नाही. कारण मी स्वतः निसर्ग शेतीच्या माध्यमातून देवाची नित्य आराधना करतो. रासायनिक शेती आणि यंत्रसामुग्री वापरणं हा धरणीवर अत्याचार आहे. त्यामुळे देव नक्कीच माझ्यावर रागावणार नाही, असंही हा चौथी पास शेतकरी सांगतो. राज्याच्या बहुतांश भागाला सध्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याविना शेतातली उभी पिकं आडवी झाली आहेत. बळीराजा आयुष्य संपवत आहे. अशात राजशेखर निंबर्गी यांची ही शेती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण आहे.


भाजीपाला सल्ला

प्रा. सी. बी. बाचकर, डॉ. के. जी. शिंदे, डॉ. एम. एन. भालेकर - रांगडा कांदा पिकाची लागवड १५ ऑक्टोबरपर्यंत करावी. - कोबी, फूलकोबी या पिकांच्या ऑक्टोबर लागवडीसाठी योग्य असणाऱ्या जातीची लागवड करावी. - लसूण पिकाच्या लागवडीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत जमिनीची तयारी करावी. सध्या राज्यामध्ये ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. या वातावरणामुळे मिरची, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांवरील किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव आहे. - मिरची (पानावरील ठिपके) - - सरकोस्पोरा नावाच्या बुरशीमुळे पानावर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. डागांचा मध्य भाग फिक्कट सफेद आणि कडा गर्द तपकिरी असतात. या रोगाला ‘फ्रॉग आय लिफ स्पॉट’ असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून, पाने पिवळी पडून ती गळतात. पानगळ झाल्यामुळे फळे उघडी पडतात. सौर उष्णतेमुळे फळांवर पांढरे चट्टे पडतात. - अल्टरनेरिया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानावर दिसतात. या डागामध्ये एकात एक अशी गोलाकार वलये असतात. असे लहान डाग एकमेकात मिसळून मोठे चट्टे होतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पाने पूर्ण होण्याअगोदर करपतात. पानगळ होते. - सरकोस्पोरा व अल्टरनेरिया या रोगाचा प्रादुर्भाव बियाण्यामार्फत होतो. उपाययोजना - लक्षणे दिसताच, (फवारणी प्रति १० लिटर पाणी) मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम - मर रोग - बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे जमिनीत पाणी साचले आहे. या स्थितीमध्ये झाडांची पाने पिवळे पडून सुकते व वाळते. मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उपाय - कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यामध्ये मिसळून, या द्रावणाची प्रति झाड ५० मिली. प्रमाणे जिरवण करावी. - टोमॅटो - सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे लवकर येणारा करपा (पानावर आणि फळांवर) तसेच विविध बुरशींच्या प्रादुर्भावाने टोमॅटो फळावर येणाऱ्या ठिपके या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ती बांधावर अथवा टोमॅटो प्लॉटशेजारी टाकू नये. फळझड आणि उशिरा येणारा करपा - या रोगाच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति दहा लिटर पाणी) मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिलि. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २५ ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन* एक ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम - आवश्यकतेनुसार बुरशीनाशक बदलून पुढील फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति दहा लिटर पाणी) सायपरमेथ्रीन (१० ईसी) १० मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (२५ डब्ल्यू.डी.जी.) ४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस.सी.) ३ मिलि. किंवा फ्लुबेन्डिअमाईड (३९ः३५ एस.सी.) ३ मिलि मर रोग - अतिपावसामुळे जमिनीत पाणी साचल्याने झाडांची पाने पिवळी पडून सुकतात व वाळतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उपाययोजना - कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति झाडास ५० मिलिप्रमाणे जिरवण करावी. - कांदा - कांदा या पिकावर फुलकिडे व करपा आढळून आल्यास, कार्बोसल्फान (२५ ईसी.) १० मिलि किंवा फिप्रोनील (५ ईसी) १५ मिलि या सोबत मिसळून मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. टीप - वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे. संपर्क - ०२४२६-२४३३४२ (अखिल भारतीय समन्वीत भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)


Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS