पेरू फळपिकाची घनपद्धतीने लागवड करण्याकडे सध्या भर दिला जात आहे, त्यामुळे पेरू लागवडीबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊ. डॉ. बाबासाहेब बडे, सुनील चाळक जमीन - पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी. जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ७.५ या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन टाळावी. लागवड - १) पारंपरिक पद्धत : जमिनीची आखणी करून ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५ ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि माती या मिश्रणाने भरून घ्यावेत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. २) घन लागवड या पद्धतीत ३ x २ मीटर अंतरावर ५० x ५० x ५० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. यामध्ये साधारणतः ५ ते १० किलो कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २.५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, २५ ग्रॅम पीएसबी, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा भुकटी, ५ ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि पोयटा माती यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाने खड्डे भरून रोपांची लागवड करावी. जाती १) सरदार (लखनऊ - ४९) या जातीच्या पेरूची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फळांचे सरासरी वजन २०० ते २५० ग्रॅम असून, रंग पिवळसर हिरवा असतो. फळ आकाराने मध्यम गोलाकार असून, गर पांढरा व गोड असतो. यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण सरासरी १२ ते १४ टक्के असते. या जातीपासून प्रतिहेक्टरी पारंपरिक पद्धतीत २० ते २५ टन, तर घन बाग लागवडीपासून ४० ते ४५ टन उत्पादन घेता येते. २) ललित : मिडो - आॅर्चर्ड (सघन लागवड) पद्धतीच्या लागवडीसाठी उपयुक्त, उच्च उत्पादनक्षम व मोठ्या क्षेत्रावर लागवड असलेली. छाटणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. लालसर पिवळ्या रंगाची फळे. आतील गर घट्ट व गुलाबी रंगाचा असतो. प्रतिझाड १ क्विंटल उत्पादनाची क्षमता. साखरेचे प्रमाण १२ टक्के, फळाचे सरासरी वजन १८५ ते २०० ग्रॅम. ललित या वाणासाठी संपर्क : केंद्रीय अर्धउष्ण कटिबंधीय फलोत्पादन संस्था, रेहमानखेरा, लखनऊ. ९१- ०५२२- २८४१०२२, २३ डॉ. बाबासाहेब बडे, ९४२३०५०४५८ (राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे) |
सद्यःस्थितीत मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावलेली कांदे बाग व या वर्षी जून-जुलैमध्ये लावलेली नवीन मृगबाग उभी आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लावलेली कांदे बाग ही घड पक्वतेच्या - घड कापणीच्या अवस्थेत आहे, तर जून महिन्यात लागवड केलेली मृगबाग ही जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. मृगबागेची पुढीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच नवीन कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात केली जात असल्याने यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. अ) मृगबाग - - मुख्य खोडानजीक येणारी पिले धारदार विळीने जमिनीलगत दर २ आठवड्यांनी कापावीत. - पावसाचे अतिरिक्त पाणी बागेत साचू नये म्हणून निचऱ्याची व्यवस्था करावी. - फर्टिगेशन - नवीन मृग बागेस फर्टिगेशन करण्यासाठी एक हजार केळी झाडांसाठी प्रती आठवडा तेरा किलो युरिया व साडेआठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे. यासाठी १०० लिटर पाण्यात प्रथम आठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश विरघळावे व त्यानंतर त्यात तेरा किलो युरिया विरघळावा. - गंधक - लागवडीनंतर १६५ दिवसांनी दहा ग्रॅम प्रती झाड बेंटोनाईट सल्फर द्यावे किंवा प्रती झाड पाच ग्रॅम मायक्रोग्रॅन्युलर सल्फर द्यावे. - सूक्ष्म अन्नद्रव्ये - लागवडीनंतर पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रति झाड शेणखतात (१५० ग्रॅम) मुरवून शिफारशीत अन्नद्रव्य मात्रेसह द्यावे. - करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ताबडतोब रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पाने काढून बागेबाहेर नेऊन जाळावीत. झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा २५ ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक चांगल्या प्रतीचे १० मि.ली. स्टीकर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ब) नवीन कांदेबाग - - या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड करावयाच्या कांदेबाग लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून, योग्य अंतरावर खोल सऱ्या पाडाव्यात. लागवडीचे अंतर किमान ५ x ५ फूट इतके ठेवावे. - लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३ ते ४ महिने वयाचे, ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. - भाैतिक संस्कार - बेण्यावरील माती, मुळ्या कोयत्याने काढाव्यात. कंदावर ३-४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. या संस्कारामुळे सुत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होते, शिवाय खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास असे बेणे वेगळे करता येते. - रासायनिक संस्कार - भौतिक संस्कार केलेल्या बेण्यावर रासायनिक संस्कार केल्यास भविष्यात उदभवणाऱ्या सुत्रकृमी आणि सिगाटोका लिफस्पॉट यांपासून संरक्षण मिळते. १०० लिटर पाणी घेऊन त्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० मिली ॲसिफेट टाकावे. ढवळावे आणि त्यात भौतिक संस्कार केलेले बेणे किमान ३० मिनिटे बुडवावे. - ऊतीसंवर्धित रोपे - लागवडीसाठी एकसारख्या वाढीची उतिसंवर्धित रोपे निवडावीत. रोपे ३० ते ४५ सें.मी. उंचीची आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत. लागवडीनंतर प्रतिदिन प्रतिझाड किमान ५ लिटर पाणी द्यावे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रोपाभोवतालची माती पायाने दाबावी. - बागेभोवती चारही दिशांनी गजराज गवत किंवा शेवरीचे सजीव कुंपण लावावे. संपर्क - डॉ. विक्रांत भालेराव, ९४२०६६१२५८ (केळी संशोधन केंद्र, जळगाव) |
सध्या बहुतेक शेतकऱ्यांची कांदा काढणी पूर्ण झाली असेल. त्यांनी खालील उपाययोजना कराव्यात. १) जोडकांदे, डेंगळे आलेले आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. २) शेतातून काढलेले कांदे साठवणगृहात ठेवण्यापूर्वी सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात आणि वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगकारक सूक्ष्मजीवांचा कांद्यात सहज प्रवेश होत नसल्याने कांदा अधिक काळ टिकतो. ३) तळाशी व बाजूंना हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहामध्ये कांदे साठवावेत. ४) लसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावेत. ५) साठवणीतील कांद्यावर तसेच लसणावर नियमितपणे देखरेख ठेवावी. सडलेले आणि पिचलेले कंद तत्काळ काढून टाकले पाहिजेत. चाळीत हवा खेळती राहील याची योग्य व्यवस्था करावी. खरीप कांद्याच्या रोपवाटिकेचे नियोजन आपण मागील सल्ल्यामध्ये पाहिले. लवकर लावलेल्या खरीप कांद्याकरिता पूर्वमशागत ः १) शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. २) वाफे तयार करण्यापूर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडीखत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. ३) गादी वाफे १५ सें.मी. उंच आणि १२० सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. इतके अंतर ठेवावे. यामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी निघून जाईल. रोपांचे काळा करपा रोगापासूनचे नुकसान कमी होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोईची आहे. ४) ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. ४ लिटर क्षमतेच्या दोन ड्रिपरमधील अंतर ३०-५० सें.मी. असावे. ५) तुषार सिंचनासाठी २० मि.मी. लॅटरल व तासी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावेत. लवकर लावलेल्या खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड ः १) पुनर्लागवडीसाठी खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ३५-४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. २) रोपवाटिकेतून रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. ३) रासायनिक खतांमधून हेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश देणे आवश्यक आहे. माती परिक्षणामध्ये जमिनीतील गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे. गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत हेक्टरी ३० किलो या प्रमाणात गंधक द्यावे. वरील एकूण खत मात्रेपैकी रोपांच्या पुनर्लागवडीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र व स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. ४) ॲझोस्पीरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी ५ किलो प्रति हेक्टर द्याव्यात. यामुळे रोपाकरिता नत्र व स्फुरद यांची उपलब्धता वाढते. ५) रोपांच्या चांगल्या वाढीसाठी पुनर्लागवड व तीन दिवसांनंतर पाणी देण्याची गरज असते. त्यानंतर आवश्यकतेनुसार ७-१० दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. पीक संरक्षण रोपांवर लागवडपूर्व प्रक्रिया ः बुरशीजन्य रोग व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, - १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मि.लि. कार्बोसल्फान प्रति लिटर - पाण्यामध्ये रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. तणनाशकांचा वापर- फवारणीची वेळ- पुनर्लागवडीच्या वेळी. प्रमाण - प्रतिलिटर पाणी - ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.लि. किंवा - पेंडीमिथेलीन (३० टक्के ईसी) ३.५ ते ४ मि.लि. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता ः प्रतिलिटर पाणी मिथोमिल ०.८ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम. - प्रतिबंधात्मक फवारणी. - डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे) |
- श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर रासायनिक खतांचा जास्त वापर म्हणजे जास्त उत्पादन असे समीकरण शेतकरी बंधु करतात पण जमिनीची काळजी न घेता रासायनिक खतांचा अतिरेक वापर हा हानिकारक असू शकतो, त्यामुळे डाळिंब रोगास जास्त बळी पडू शकतो. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे माती परीक्षण करून एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापण करणे अतिशय गरजेचे आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डाळिंब एकात्मिक खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापण हा लेख लिहित आहे. डाळिंब पिकाला आपली भूक भागवण्यासाठी 17 अन्नद्रव्याची, सेंद्रिय खतांची आणि जिवाणू खतांची गरज असते व ते संतुलित पद्धतीने म्हणजे डाळिंब पिकाला ज्या अवस्तेमध्ये, ज्या अन्नद्रव्याची, ज्या प्रमाणात, ज्या स्वरूपात गरज आहे ते उपलब्ध करून देणे होय. खते वापरताना घ्यावयाची काळजी :- - कोणतेही कॅल्शिअम युक्त खतामध्ये सुल्फेट युक्त खते मिसळू नये, मिसळल्यास जिप्सम तयार होतो व तो सुल्फेट व कॅल्शिअम उपलब्ध होऊ देत नाही. - कोणत्याही फॉस्फरस युक्त खतांमध्ये कॅल्शिअम व मिक्रोनुट्रिएन्ट युक्त खते मिक्स करू नये. - चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअम युक्त खते टाकू नये, जसे कि जिप्सम, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम नायट्रेट. श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर - पाणी तोडणे व पानगळ करते वेळी घ्यावयाची काळजी - डाळिंबाचा बहार धरण्यापूर्वी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे झाडाला ताण देणे किंवा विसावा देणे. जर जमिनीत व झाडात कर्ब : नत्र गुणोत्तर 10 ते 12 : 1 असेल तर येणारी फुले गुच्छ स्वरूपात किंवा झुपक्याने येतात, मादी व नराचे शेकडा प्रमाण 70 : 30 योग्य असते. त्यामुळे चांगले परागीभवन होते. त्यासाठी ताण काळात जोपर्यंत झाडे कार्यक्षम व हिरवीगार असताना म्हणजे पानांची कर्ब ग्रहनाची क्रिया चालू असते. त्यावेळी 5 ग्रॅम 00 : 52 : 34 व 5 मिली मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर पाणी असा फवारा घ्यावा, हि फवारणी ताण काळात दोन वेळेस घ्यावी. - पाण्याचा ताण हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस तर भारी जमिनीत 45 ते 60 दिवस पाणी बंद करावे. - डाळिंबाला कमीतकमी नयसर्गिक ताण बसने महत्वाचे, म्हणजे 5 % पर्यंत आतील जुने पाने गळणे व पूर्ण शेंड्याची वाढ थांबणे होय. परंतु या अवथ्येच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते. म्हणून वरील प्रमाणे नयसर्गिक पानगळ झाल्यानंतर इथ्रेल चा स्प्रे घ्यावा. - इथ्रेल ऐवजी इतर कोणतेही रासायनाने पानगळ करू नये, फवारणी नंतर कमीत कमी 80 % पानगळ होणे आवश्यक असते, 80 ते 100 % पानगळ झाल्यावर लगेच पाणी चालू करावे. - इथ्रेल चा वापर नयसर्गिक पानगळ किती झाली त्यापद्धतीने कमी जास्त करून 1 ते 2.5 मिली प्रति लिटर व त्यात 0 : 52 : 34 @ 5 ग्रॅम प्रति लिटर टाकून फवारणी सायंकाळी करावी कारण दुपारी पानांचा stomata बंद असतो. - जमिनीची आडवी हुबी नांगरणी करून झाडालगतची जमीन चाळून घ्यावी. - पानगळ करण्याअगोधर 1 % व पानगळ झाल्यानंतर 0.5 % बोर्डो मिक्सचर चा छाटणी करून स्प्रे घ्यावा. - पाणीच्या तानानंतर पहिले पाणी देण्याअगोदर बेसल डोस खालील पद्धतीने भरावा. - 10 kg शेणखत + 1 किलो व्हर्मीकंपोस्ट + 500 ग्रॅम निंबोलीपेन्ड प्रति झाड जेथे ड्रीपर चे पाणी पडते तेथे खंडा करून भरावे व त्यावर 150 ग्रॅम DAP + 100 ग्रॅम MOP + 100 ग्रॅम युरिया + 100 ग्रॅम मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट + बेनसुल्फ 10 ग्रॅम प्रति झाड टाकावे व वरून पालापाचोळा टाकून आच्छादन करावे. - डाळिंब पिकाला स्लरिचा वापर (अती महत्वाचे) खालील तिन्ही स्लरिंचा वापर दोन महिन्यातून एकदा असा कमीतकमी तीन दा करावा, त्यामध्ये पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 45 दिवसांमध्ये एकदा, 45 ते 90 दिवसांमध्ये एकदा व 90 ते 120 दिवसांमध्ये एकदा करावा. 1. जिवाणू खते स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 2 किलो काळा गूळ + 500 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर + 500 ग्रॅम फॉस्फेट सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम ( PSB) + 500 ग्रॅम पोटॅश सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम (KSB) + 1 लिटर EM 2 द्रावण + 300 लिटर पाणी. 2. जिवाणू बुरशीनाशके स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 2 किलो काळा गूळ + ट्रायकोडर्मा 1 किलो + स्पिडोमोनास 1 किलो + स्पासिलोमायसीज 1 लिटर + 300 लिटर पाणी. 3. सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 25 किलो निंबोलीपेन्ड + 5 किलो झिंक सुल्फेट + 5 किलो फेरस सुल्फेट + 5 किलो मॅग्नेशिअम सुल्फेट + 1 किलो बोरॉन + 300 लिटर पाणी. वरील तिन्ही स्लरी आधी 100 ते 150 लिटर पाण्यात बनवून 5 ते 6 दिवस सावलीत ठेवायची, दररोज 2 मिनिट हलवायची किंवा चांगली मिक्स करायची व 7 व्या दिवशी उरलेले पाणी त्यात टाकून वापश्यावर जमिनीत पिकास आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी साधारणतः 1 लिटर प्रति झाड, एक एकर साठी. टिप.. शक्य तो जिवाणू खते स्लरी आणि जिवाणू बुरशीनाशके स्लरी एकत्र करू नये व वरील स्लरी वापरताना दोन स्लरीनमध्ये कमीत कमी 2 दिवसाचे आंतर ठेवावे. ड्रीप द्वारे विद्राव्य खतांचा वापर :- - पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 30 दिवसापर्यंत 12 : 61 व 13 : 40 : 13 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 30 ते 60 दिवसापर्यंत 13 : 40 : 13 व 0 : 52 : 34 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 60 ते 90 दिवसापर्यंत 0 : 52 : 34 व 13 : 0 : 45 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 90 ते 120 दिवसापर्यंत Pottasium Schoenite व 0 : 52 : 34 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 120 ते 150 दिवसापर्यंत 0 : 0 : 50 @ 3 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - कॅल्शिअम नायट्रेट चा वापर 5 किलो पर एकर ड्रीप द्वारे किंवा 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी द्वारे 2 महिन्यातून एकदा गरजेनुसार करावा. ड्रीप द्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर :- - पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 45, 45 ते 90 आणि 90 ते 120 दिवसामध्ये 3 वेळेस 3 लिटर पर एकर चिलेटेड मिक्स/मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट द्यावे. फवारणीद्वारे खत मात्रा :- - फुले येण्यापूर्वी 2 ग्राम प्रती लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट चा स्प्रे घ्यावा. - फुलगळ होत असेल तर 2 प्रती लिटर ने बोरॉन चा स्प्रे घ्यावा. - 50 % फुले आल्यानंतर 2 ग्राम प्रति लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट व 12 : 61 @ 5 ग्राम प्रति लिटर चा दुसरा स्प्रे घ्यावा. - फळ तोडण्यापूर्वी 10 दिवस potassium schoenite 5 ग्राम प्रति लिटर ने स्प्रे घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. ओमप्रकाश यशवंत हिरे पी. एच. डी. विद्यार्थी मृद विज्ञान आणि कृषि रासायनशास्त्र म. फु. कृ. वि. राहुरी 7588015491आणि श्री. राजू गाडेकर कृषि सल्लागार (एम. एस. सी. भाजीपालाशास्त्र 7709490777 कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते... आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका... || अन्नदाता सुखी भवः || होय आम्ही शेतकरी |
सद्यपरिस्थितीत काही ठिकाणी डाळिंब बागांमध्ये सूत्रकृमी, तेलकट डाग रोग व मर या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. डॉ. सुनील पाटील मुळावर गाठी करणारी सूत्रकृमी : - बहार धरतेवेळी प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळल्यास फोरेट (१०जी) ६५ किलो प्रति हेक्टरी रिंग पद्धतीने झाडाभोवती टाकावे. - जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस किंवा सुडोमोनस फ्ल्युरोसन्स २० किलो प्रति हेक्टर (२.५ टन निंबोळी पेंडमध्ये मिसळून) या प्रमाणात रिंग पद्धतीने झाडाभोवती टाकावे. - इतर अवस्थांतील फळबागांत सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असल्यास फोरेट २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात झाडाभोवती खड्डा करून टाकावे. नंतर झाकून घ्यावे. - दोन झाडांच्या व ओळींच्या मधल्या रिकाम्या जागेत किंवा झाडाभोवती गोल कडेने झेंडू लागवड करावी. त्यामुळे सूत्रकृमींची संख्या कमी होते. झेंडूची अशापद्धतीने ४ ते ५ महिने लागवड केल्यास चांगले निष्कर्ष मिळतात. - बागेत स्वच्छता ठेवावी. रोग : तेलकट डाग नियंत्रणाचे उपाय : - उशिराच्या आंबेबहाराची संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी. - हस्त बहार घेण्यापूर्वी इथेफॉन १ते २ मि. लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून संपूर्ण पानगळ करावी. - रोगट फांद्यांची छाटणी करावी. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत. - बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर किंवा कॉपर डस्ट (४ टक्के) २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात धुरळणी करावी. - खोडाला ब्रोमोपॉल ५० ग्रॅम अधिक कॅप्टन ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात मिश्रण करुन त्याचा मुलामा द्यावा. - नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल २५० पीपीएम (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण १ टक्के किंवा कॅप्टन ०.२५ (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) टक्केची फवारणी करावी. पानावर आणि फळावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशीच फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने चालू ठेवावी. रोग नसेल तर ३० दिवसांचे अंतराने फवारणी करावी. पावसाळी हंगामात रोगाच्या तीव्रतेनुसार ही फवारणी चालू ठेवावी. फळ काढणीच्या २० दिवसांपूर्वी फवारणी बंद करावी. - शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. २. मर रोग नियंत्रणाचे उपाय : - सध्या पावसाळा असल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. - रोगाची लागण दिसून आल्यास ताबडतोब हेक्झाकोनॅझोल १५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २० ग्रॅम अधिक क्लोरपायरीफॉस (०.२० इसी) २५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण बनवून प्रति झाड ५ लिटर याप्रमाणात रिंग पद्धतीने ओतावे. - रोगाची लक्षणे झाडाच्या वेगवेगळ्या भागांवरही दिसून येतात; म्हणून संपूर्ण झाडावर हेक्झाकोनॅझोल १० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. - रोगाने संपूर्ण वाळलेली व मेलेली झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत. अशी रोगट झाडे जाळण्यास नेताना त्यांची रोगट मुळे प्लॅस्टिक पिशवीच्या सहाय्याने झाकून घ्यावी. कारण बुरशीचे बीजाणू मोठ्या प्रमाणावर मुळांमध्ये असल्यामुळे चांगल्या झाडांना रोगाची लागण होते. - झाडांची छाटणी पावसाळ्यात करू नये. कारण हाच किडीचाही अनुकूल कालावधी असतो. किडी या काळात छाटलेल्या भागांमधून निघणाऱ्या पेशीरसाकडे आकर्षित होतात. त्यामुळे बुरशीचा प्रसार होतो. - छाटलेल्या भागांना १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना प्रति १० लिटर पाणी) लगेच लावावी. - रोगासाठी कारणीभूत खोड किडीच्या नियंत्रणासाठी गेरू ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (०.२० ईसी) ५० मि.लि.अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लि. पाणी या प्रमाणात मिसळून झाडाच्या खोडास जमिनीपासून २ फुटांपर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे. गेरू रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी औषधे टाकावीत. - खोडकिडा नियंत्रणासाठी डायक्लोरव्हाॅस १० मि.लि प्रति लिटर पाणी याप्रमाणात मिसळून हे द्रावण छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे सोडावे व छिद्रे बंद करावीत. डॉ. सुनील पाटील, ९४२०५३६९७१ (डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, ता. बागलाण, जि. नाशिक.) |
लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड महत्त्वाची आहे. कारण एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंत वापरता येते. सेलम, फुले स्वरूपा, कृष्णा, रोमा, प्रतिभा यांसारख्या जातींची निवड करावी. जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी ताग किंवा धैंचा गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. डॉ. जितेंद्र कदम हळद हे नऊ महिन्यांचे पीक अाहे. याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड सुरू होते. १) हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढत असल्याने एक फूट खोलीमधील मातीचे माती परीक्षण करावे. हळदीचे उत्पादन प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून आहे. २) जमीन ही उत्तम निचरा असणारी निवडावी. कारण हे पीक जमिनीमध्ये आठ ते नऊ महिने राहते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंद कूज लागण्याचा धोका वाढतो. ३) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. ४) जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी ताग किंवा धैंचा गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. ५) भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो लागवडीसाठी टाळाव्यात. ६) माळरानाच्या जमिनीमध्येसुद्धा याची लागवड करता येते; परंतु या जमिनीमध्ये सरासरी उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने सुपीकता वाढविणे आवश्यक आहे. संतुलित प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ७) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम पिवळसर छटा राहते. कारण अन्नद्रव्यांचे ग्रहण या जमिनींमध्ये योग्य प्रकारे होत नाही. ८) हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटीमधील अंतर कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे. ९) जमिनीमधील लव्हाळा, हराळी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत, तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात. त्यानंतर कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळीअगोदर एकरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सध्याच्या काळात शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण यांचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा. १०) जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. बियाणे निवड - लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड महत्त्वाची आहे. कारण एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंत वापरता येते. बियाणे निवडताना - - बियाणे जातिवंत असावे. सेलम, फुले स्वरूपा, कृष्णा, रोमा, प्रतिभा यांसारख्या जातींची निवड करावी. - बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. दीड ते दोन महिने बियाण्याची काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. - बियाणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. बियाण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बियाणे मऊ पडते व असे मऊ पडलेले बियाणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बियाणे उगवत नाही. बीजप्रक्रियेसाठी कीडनाशकात टाकले असता ते वर तरंगते. - मातृकंद बियाणे असल्यास ते त्रिकोणाकृती असावे. - बियाण्यावर एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावे. - बियाण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. बियाण्याचे प्रकार - १) मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे - या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते. मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते. २) बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे - मुख्य रोपाच्या बाजूला जे फुटवे येतात त्याच्या खाली जे कंद तयार होतात त्यास बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते. ३) हळकुंड - ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे. लागवडीसाठी बियाणे तयार करणे - १) लागवडीच्या पूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावर पाणी मारावे, जेणेकरून ढिगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून बियाणे लागवडीस तयार करावे. - हळदीसाठी बेवड म्हणून कंदवर्गीय पिके जशी आले, बटाटा किंवा हळदीवर हळद घेणे शक्यतो टाळावे. हळदीसाठी द्विदलवर्गीय पिके जशी घेवडा, हरभरा, भुईमूग यांसारख्या पिकांचा बेवड चांगला असतो. संपर्क - डॉ. जितेंद्र कदम - ९८२२४४९७८९ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली) |
फणस हे कोरडवाहू फळझाड असून फणसाची फळे कोकण भागात अतिशय लोकप्रिय आहेत. कोकणात १५० ते २०० वर्षे वयाची फणसाची झाडे अनेक ठिकाणी आढळतात. कोकणात आणि पश्चिम घाटातील जंगलात फणसाची झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात कॉफी, नारळ, सुपारी, वेलदोडा, आणि काळी मिरी या पिकांची लागवड करताना त्या पिकांना सावली मिळावी म्हणून फणसाची झाडे लावली जातात. अलीकडच्या काळात पुण्या - मुंबईसारख्या शहरी भागात फणसाची फळे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून आयात केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात फणसाची व्यापारी तत्त्वावर लागवड करणे फायदेशीर होऊ लागले आहे. उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार: फणस हे मोरेसिया या वनस्पती कुळातीळ फळझाड असून फणसाचे उगमस्थान भारत देश समजले जाते. भारतातून या झाडाचा प्रसार मलेशिया वेस्ट इंडिज इत्यादी देशात झाला. जगात भारत, म्यानमार, श्रीलंका, जमैका, मॉरिशस, बाझील इत्यादी देशांत फणासाची झाडे आढळतात. भारतात फणसाची लागवड प्रामुख्याने आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू आणि पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर केली जाते. फणस हा पोषणमूल्याच्या दृष्टीने पौष्टिक असतो. फणसाच्या गरापेक्षा फणसाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि खनिजे तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे फणसाच्या बिया भाजून किंवा उकडून खाणे कोकणात फारच लोकप्रिय आहे. कोकणात फणसाची कच्ची फळे भाजी करण्यासाठी वापरतात. फणसाच्या फळांचे गर आणि बी सोडून राहिलेल्या ५५ ते ६५ % फळाचा भाग जनावरांना खाद्य म्हणून वापरता येतो. फणसाच्या गरापासून पापड आणि सुकविलेले पदार्थ तयार करता येतात. फणसापासून फणसपोळी, जॅम, जेली, सरबत, लोणचे इत्यादी विविध टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. कापा फणसाचे गरे हवाबंद डब्यात भरून साठविता येतात. फणसाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील घटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. अन्नघटक प्रमाण कच्चा गर पक्व गर बिया पाणी ८४ ७७ ६५ शर्करा (कार्बोहायड्रेट्स ) ९.० १९.० २६.० प्रथिने (प्रोटिन्स) २.६ २.० ६.६ स्निग्धांश (फॅट्स) ०.३ ०.१ ०.४ खनिजे ०.९ ०.८ १.२ तंतुमय पदार्थ - १.१ - कॅल्शियम ०.०५ ०.०२ ०.०२ फॉस्फरस ०.१० ०.०३ ०.०३ लोह ०.००२ ०.५ - पोटॅशियम ०.०२५ - - जीवनसत्त्व 'अ' - ५४० इंटरनॅशनल युनिट १७ इंटरनॅशनल युनिट उष्माक (कॅलरी) - ८४ - फणसाच्या झाडाला वाळवी लागत नाही. फर्निचरसाठी फणसाचे लाकूड उत्कृष्ट समजले जाते. फणसाच्या लाकडाला पॉलिश केल्यावर ते आणखी उत्कृष्ट दिसते. कोकणात तसेच देशावर घरासाठी फणसाचे लाकूड वापरले जाते. फणसाचे लाकूड चांगले टिकाऊ असून या लागडाचा वापर शेती अवजारांसाठी बैलगाड्यांचे जू, विहिरीसाठी, भात गिरणीतील उखळाचे दांडे आणी बोटीसाठी करतात. फर्निचर केबिनेट्स तसेच पेट्या तयार करण्यासाठी फणसाचे लागूड उत्कृष्ट असल्याने फणसाच्या लाकडाची निर्यात होते. क्षेत्र आणि उत्पादन : भारतात अंदाजे ६६,७५२ हेक्टर क्षेत्र फणसाच्या लागवडीखाली असून त्यापैकी सर्वांत जास्त क्षेत्र बिहार आणि आसाम या राज्यांत आहे. आसाममध्ये फणसाच्या लागवडीखाली ८,००० हेक्टर क्षेत्र असून बिहारमध्ये ४,००० हेक्टर क्षेत्र आहे. दक्षिण भारतात सुमारे २,००० हेक्टर क्षेत्र फणसाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात सुमारे १,००० हेक्टर क्षेत्र असून ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा या राज्यात फणसाची झाडे आढळतात. वार्षिक उत्पादन सुमारे १५,००० टनांच्या आसपास येते. हवामान आणि जमीन : फणसाचे पीक उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणारे आहे. कोकणातील उष्ण आणि दमट हवामानात फणसाच्या झाडाला चांगले मानवते. अहमदनगर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, घुळे या जिल्ह्यांत फणसाची झाडे चांगली वाढतात. अतिउष्ण आणि अतिकोरडे हवामान फणसाच्या झाडाला मानवत नाही. धुके आणि कडाक्याच्या थंडीचा फणसाच्या झाडावर वाईट परिणाम होतो. इतर कोरडवाहू झाडांच्या तुलनेत फणसाच्या झाडाला कसदार आणि खोल जमीन लागते. फणसाचे झाड उत्तम गाळाच्या आणि खोल जमिनीत चांगले वाढते. जांभ्या दगडापासून बनलेल्या सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, रेताड पोयटा अथवा तांबड्या जमिनीत फणसाची वाढ चांगली होते. सुधारीत जाती : फणसामध्ये फळाचा आकार आणि गराचा रंग, मऊपणा, इत्यादींवरून वेगवेगळ्या स्थानिक जाती प्रचलित आहेत. परंतु फणसाच्या स्थानिक जाती उपलब्ध नाहीत. फणसाच्या झाडाचे गराच्या मऊपणावरून 'कापा' आणि 'बरका' अस दोन प्रमुख प्रकार पडतात. फळांच्या बाह्य स्वरूपावरून कापा आणि बरका या जातीची फळे ओळखण्यास शक्य होत नाही. यासाठी मूळ झाडांची माहिती असणे आवश्यक असते. १) कापा फणस : कापा प्रकारच्या फणसाच्या फळातील गरे कोरडे, खुसखुशीत, गोड आणि उत्तम स्वादाचे असतात. गरे पिवळे, पिवळे जर्द किंवा केशरी रंगाचे असतात. कापा फणसाचे गरे मीठ लावून तळल्यास चांगले खुसखुशीत लागतात. पिकलेले गरे हवाबंद डब्यात साठविता येतात. म्हणून कापा फणसांना बाजारात चांगली मागणी असते. २) बरका फणस : बरका प्रकारच्या फळांचे गरेम मऊ, रसाळ आणि भरपूर प्रमाणात रेषा असलेले आढळतात. अशा गरांपासून प्रामुख्याने फणसपोळी आणि घारगे तयार करतात. ह्या फणसाचे गरे जास्त काळ टिकत नाहीत, परंतु या फणसाच्या गऱ्यांपासून तयार केलेली फणसपोळी वर्षभर साठविता येते. ३) सिंगापुरी फणस : सिंगापुरी जातीचे फणस दक्षिण भारतात काही ठिकाणी आढळून येतात. ही जात श्रीलंकेतून आणण्यात आली आहे. या जातीच्या फळांना अडीच ते तीन वर्षांची फळे धरण्यास सुरुवात होते. ही भरपूर उत्पादन देणारी जात असून या जातीची फळे मोठी आणी मध्यम दर्जाची असतात. ४) नारळी फणस : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा या गावी फणसाचे झाड निवड पद्धतीने शोधून काढले आहे. या फणसाची फळे नारळाच्या आकाराएवढी असतात. म्हणून यास नारळी फणस असे म्हणतात. नारळी फणसाच्या एका फळाचे वजन दोन किलोपर्यंत असते. या जातीच्या फणसाचे गरे कापा प्रकारचे असतात. सर्वसाधारणपणे फणसाच्या मोठ्या फळात २७% गरे आणि १६% बी आढळते. अशाप्रकारे मोठ्या फणसात ३७% गरे आणि बी असते. तर नारळी फणसात ५०% गरे आणि बी असते. ५) गुलाबी गराचा फणस : कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर येथे गुलाबी रंगाचे, कापा प्रकारचे गोड आणि उत्कृष्ट स्वादाचे गरे असलेले फणसाचे झाड निवड पद्धतीने शोधून काढण्यात आले आहे. या झाडाची फळे सर्वसाधारणपणे ३ ते ५ किलो वजनाची असतात. काही फळांचे वजन ७ ते १० किलोपर्यंत असते. या फळातील गरांना विशिष्ट प्रकारचा रुचकर आणि गोड स्वाद असतो. या फणसाचे गरे गुलाबी रंगाचे, मधासारखे गोड, जाड आणि घट्ट असतात. ६) रुद्राक्षी फणस : रुद्राक्षी फणसाची फळे आकाराने गोल आणि मोठी असतात. या जातीच्या फळाची साल बाहेरच्या बाजूने मऊ आणि कमी काटेरी असते. परंतु फळाची प्रत कमी दर्जाची असते. अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : फणसामध्ये परपरागीभवन होत असल्यामुळे बियांपासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म मातृ वृक्षासारखेच येत नाहीत. यासाठी निवडक झाडांपासून कलमे तयार करून फणसाची लागवड करावी. मातृवृक्षाची निवड करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. १) लवकर फळे धरणारी झाडे असावीत. २) फळे मध्यम आकाराची असावीत ३) झाडे अधिक उत्पादन देणारी असावीत ४) फळामध्ये गराचे प्रमाण अधिक असावे. ५) गरे जाड, गोड, उत्कृष्ट स्वादाचे, खुसखुशीत आणि आकर्षक रंगाचे असावेत. बियांचा आकार लहान असावा. भेट कलम, गुटी कलम, मृदुकाष्ठ कलम, अंकुर कलम, आणि ठिगळ कलम पद्धती ने डोळे भरणे आशा विविध पद्धतींनी फणसाची कलमे तयार करता येतात. यापैकी अंकुर कलम आणि ठिगळ पद्धतीने डोळे भरणे या पद्धती सोप्या असून ८०% यशस्वी ठरतात. १) अंकुर कलम : अंकुर कलम करताना प्रथम खुंटरोप तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेल्या फणसाच्या मोठ्या आकाराच्या बिया निवडाव्यात. अशा बिया १५ x २० सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशवीत सुमारे १ सेंटिमीटर खोल पेराव्यात. पिशव्या भरण्यासाठी माती आणि शेणखत (३:१) यांचे मिश्रण वापरावे. पिशव्यांना नियमितपणे पाणी द्यावे. साधारणपणे २० ते २५ दिवसांत फणसाच्या बिया रुजून पिवळसर हिरव्या रंगाचे अंकुर वर येतात. बिया रुजल्यावर ८ ते १५ दिवसांच्या आत त्यावर कलम करावे. कलमे करण्यासाठी जोमदार वाढणारे आणि पेन्सिलच्या जाडीचे हिरवट रंगाचे खुंटरोप निवडावे. कलमाचे यश डोळकाडीच्या निवडीवर अवलंबून असते. निवडलेल्या झाडांपासून फांदीच्या टोकाकडे जून झालेली परंतु गर्द हिरव्या रंगाची, खुंटरोपाच्या जाडीची, १० ते १५ सेंटिमीटर लांबीची डोळकाडी निवडावी. काडीच्या शेंड्यावरील डोळा फुगीर असावा. हे डोळे जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १० लि. पाणी या द्रावणामध्ये ५ ते १० मिनिट बुडवून घ्यावा. नंतर निवडलेल्या खुंटरोपांचा अंकुर जमिनीपासून ६ ते ८ सेंटिमीटर अंतरावर छाटावा. त्यानंतर बरोबर मध्यावर ५ ते ६ सेंटिमीटर लांबीचा छेद घ्यावा. निवडलेल्या डोळ्काडीवरही छेदाच्याच लांबीची पाचर करावी. ही प्रक्रिया केलेली पाचर रोपाच्या छेदलेल्या भागात बसवून पॉलि थीन कागदाच्या पट्टीने घट्ट बांधावी. कलम बांधताना काडीचा आणी रोपाचा कापलेला भाग एकमे कांवर बरोबर बसेल याची काळजी घ्यावी. डोळकाडी रोपाच्या जाडीपेक्षा थोडी जाड असेल तर डोळ्काडीची एक बाजू खुंटरोपावर नीट बसवावी. बांधलेले कलम सावलीत ठेवावे आणि कलमाला नियमितपणे पाणी द्यावे. कलम बांधल्यापासून सुमारे तीन आठवड्यांनी नवीन फूट येण्यास सुरुवात होते. याच वेळी खुंटरोपावर कलमांच्या जोडाच्या खालच्या भागात येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. फणसाची अंकुर कलमे तयार करण्यासाठी एप्रिल ते मे हा काळ सर्वांत उत्तम असतो. या काळात तयार केलेली ७० ते ८०% कलमे यशस्वी होतात. २) ठिगळ पद्धतीने डोळे भरणे : (पॅच बडिंग): ठिगळ पद्धतीने डोळे भरून कलमे तयार करण्यासाठी एक ते दीड वर्षे वयाची खुंटरोपे निवडावीत. खुंटरोपाच्या बुंध्यापासून १५ ते २० सेंटिमीटर उंचीवर १.८ x २.५ सेंटिमीटर आकाराचा पॅच काढावा. त्याच आकाराचा डोळा असलेला पॅच (जर्मिनेटरची वरीलप्रमाणे प्रक्रिया केलेला) निवडलेल्या डोळकाडीवरून काढून तो रोपाच्या कापलेल्या भागावर व्यवस्थित बसवावा आणि पॉलिथीन कागदाच्या पट्टीने बांधावा. या पद्धतीने सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात कलमे तयार केल्यास ७० ते ८०% कलमे जगतात. फणसाच्या कलामांच्या लागवडीसाठी एप्रिल - मे महिन्यात १ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. प्रत्येक खड्डयात ५ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत, दीड ते दोन किलो हाडांचा चुरा, ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत आणि माती मिसळून खड्डे भरावेत. पावसाळ्यात प्रत्येक खड्ड्यात फणसाचे एक रोप अथवा कलम लावावे. कलम लावल्यानंतर पाऊस नसल्यास कलमांन लगेच पाणी द्यावे. हंगाम आणि लागवडीचे अंतर : फणसाची लागवड सपाट जमिनीवर चौरस पद्धतीने करावी. फणसाच्या रोपांची अथवा कलमांची लागवड १० x १० मीटर अंतरावर करावी. लागवड साधारणपणे पावसाला सुरू झाल्यावर जून महिन्यात करावी. पावसाळ्यात कलमाजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. भटक्या जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडाभोवती कुंपण घालावे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झाडाच्या बुंध्याशी पालापाचोळा किंवा गवताचे आच्छादन घालावे. वळण आणि छाटणीच्या पद्धती : फणसाच्या झाडांची नियमित छाटणी केली जात नाही, परंतु झाडाला योग्यवळण देण्यासाठी सुरूवातीच्या काळात जमिनीपासून अनेक खोडे वाढू नयेत म्हणून छाटणीची आवश्यकता असते. झाड एकाच खोडावर ठेवावे. जमिनीपासून ३ फुटापर्यंतच्या खोडावरील फुटवे काढून फांद्या सर्व दिशांना विखुरलेल्या स्थितीत राहतील अशा ठेवाव्यात. जून आणि अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. दरवर्षी वाळलेल्या, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी. खते आणि पाणी व्यवस्थापन : फणसाच्या झाडांना लागवडीनंतर फारशी खते दिली जात नाही. परंतु अधिक उत्पादनासाठी फणसाला पुढील प्रमाणात खते द्यावीत.झाडाचे (वर्षे) खतांचे प्रमाण शेणखतकिलो कल्पतरू खत नत्र (ग्रॅम) स्फुरद (ग्रॅम) पालाश (ग्रॅम) १ ५ २५० ग्रॅम १०० ५० ५० २ १० ५०० ग्रॅम २०० १०० १०० ३ १५ ७५० ग्रॅम ३०० १५० १५० ४ २० १ किलो ४०० २५० २५० ५ आणि त्यापुढील वर्षे २५ २ किलो ५०० २५० २५० फणसाच्या झाडाला शक्यतो ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात खते द्यावीत. खते झाडाच्या बुंध्याशी फांद्यांच्या पसाऱ्याखाली मातीत चांगली मिसळून द्यावीत. लागवडीपासून सुरूवातीची दोन वर्षे झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फुले येण्याच्या आणी फळधारणेच्या काळात झाडाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. रोपांच्या (कलमांच्या) रोगमुक्त चांगल्या वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या (५०० मिली + १०० ते १५० लि. पाणी याप्रमाणे) जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी फवारण्या कराव्यात. त्याचबरोबर पीक परिस्थितीनुसार तज्ञांशी संपर्क साधून तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल. आंतरपिके आणि तणनियंत्रण : फणसाच्या बागेत सुरूवातीच्या ८ ते १० वर्षापर्यंत दोन झाडांच्यामध्ये पावसाळ्यात चवळी, श्रावण घेवडा, भेंडी, मिरची, टोमेटो, कुळीथ, स्टायलो इत्यादी आंतरपिके ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी घ्यावीत. पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी शेवग्याची झाडे आंतरपिके म्हणून लावता येतात. बागेतील तण मुख्य पिकाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात आणि त्याचा अनिष्ट परिणाम मुख्य पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो, म्हणून वेळोवेळी झाडाभोवतालच्या तणांचा बंदोबस्त करावा. निंदणी, खुरपणी करून तणांच्या बंदोबस्तासाठी बागेत दोन झाडांमधील मोकळ्या जागेत हिरवळीची पिके घ्यावीत. महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : फणसाचे झाड अतिशय काटक आणि कणखर असून या झाडावर किडींचा उपद्रव फारसा होत नाही, क्वचित प्रसंगी खोडकिडा, शेंडा कुरतडणारी अळी, मिलिबग आणि खवले किडीचा उपद्रव होतो. खोडकिडा : या किडीची अळी झाडाच्या फांद्या आणि खोडांवर छिद्रे करून आत शिरते आणि आतील भाग पोखरत जाते. त्यामुळे फांद्या वाळतात. उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात १५ ते २० ग्रॅम कार्बारिल (सेव्हीन ५०%) ची फवारणी करावी. २) उंदीर : फणसाच्या मुळ्या उंदरांना खूप आवडत असल्याने बऱ्याच वेळा उंदीर मुळ्या खाऊन झाडाला कमकुवत करतात आणि काही वेळा झाड मरते. उपाय : उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिळाजवळ झिंक फॉस्फॉईडच्या गोळ्या ठेवाव्यात. महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :फणसाच्या झाडावर फारसे नुकसानकारक रोग आढळून येत नाहीत. फळ कूज : हा रोग रायझोपस अरटोकार्पी नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीचा उपद्रव झालेली फळे सडतात आणि पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात. त्या करिता फुल निघाल्यापासून फळ साधारण मोठे आंब्याएवढे होईपर्यंत सप्तामृताच्या चार फवारण्या १५ - १५ दिवसांच्या अंतराने तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात. फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री: फणसाच्या बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या फणसाच्या झाडांपासून लागवडीनंतर दहा वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. कलमांच्या लागवडीनंतर ७ ते ८ वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. फणसाच्या झाडाच्या फुलोऱ्यात नर आणि मादी फुले लांब, लोंबकळत्या नतकणीस (कॅटकीन) प्रकारच्या पुष्पबंधात येतात. मादी फुले आंगठ्याच्या आकाराची आणि हिरवी असतात. फळे मुख्य खोडावर, खोडाच्या पायथ्याशी किंवा मुख्य फांद्यांच्या वर बगलेत येतात. फुलांना विशिष्ट सुगंध असतो. फणसाच्या झाडाला पश्चिम भारतात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात फुले येतात. नर फुले काही दिवसानंतर आपोआप गळून पडतात. फणसाची फळे जुलै ते ऑगस्ट या महिन्यात काढणीस तयार होतात. फळे सर्वसाधारणपणे ५० - ६० सेंमी लांबीची आणि २० - ३० सेंमी रुंदीची असतात. फळांची साल सुमारे ५ - ७ सेंटिमीटर जाड असते. फळाच्या सालीवर बाहेरील बाजूला रुंद, टोकदार किंवा बोथट काटे असतात. साल भरपूर जाड असल्यामुळे फळांना टिकाऊपणा चांगला असतो आणि त्यांचे स्वतंत्र पॅकिंग करावे लागत नाही. फळे वजनाने सुमारे ५ किलो पासून २५ किलोपर्यंत भरतात. प्रत्येक झाडाला सुमारे २५ ते ५० पर्यंत फळे लागतात. त्यांचे वजन २०० किलो ग्रॅम येते. एका झाडापासून ४० ते ५० वर्षे फळे मिळतात. फळांची साठवण आणि पिकविण्याची पद्धती : फणसाची फळे झाडावरून काढल्यानंतर ट्रकने बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवितात. पूर्ण वाढलेली फळे काढणीनंतर ३ - ५ दिवसांत पिकून त्यांना चांगला वास येतो. काढणीनंतर फळे एकमेकांवर उघड्यावरच रचून ठेवतात. फणसाची फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत. |
१) पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. २) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. ३) बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल. सदोष बियाणे - १) ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीबरोबर जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. २) यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे. ३) त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहेत, असे समजावे. ४) सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच त्या बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध नाहीत, असे म्हणतात. ४) शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाणाची निवड करावी, कारण जरी बियाणे शुद्ध असले, तरी वातावरणातील बदलामुळेदेखील काहीवेळा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतकरी असे बियाणे सदोष असल्याचे समजतात. बियाणे सदोष आढळल्यास घ्यावयाची काळजी - १) बियाणे साधारणतः ५ ते ७ दिवसांत उगवते. यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करावे. बियाण्याची उगवण कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची बियाणे निरीक्षणे, पंचायत समिती यांना तपासणी करणेबाबत समक्ष सांगावे. २) बियाण्यामध्ये अनुवांशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी. ३) तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची सत्यप्रत जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच कणसात दाणे न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते. ४) बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता / उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. ५) शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठित केलेली आहे. यामध्ये कृषी विकास अधिकारी, बीज प्रमाणीकरण अधिकारी, बियाणे महामंडळाचा प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असतो. ही समिती आगाऊ नोटीसद्वारे बाधित बियाणे क्षेत्रास केव्हा पाहणी करणार त्याची माहिती देत असतात. ६) शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात शुद्ध बियाणे मिळावे, कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, खरीप हंगाम तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक, यांसारख्या समित्या गठित करण्यात येतात. ७) प्रत्येक तालुक्यात गुणनियंत्रण निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात येतात. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत बियाणे समाविष्ट असल्यामुळे बियाण्याची साठेबाजी करणे, चढ्या भावाने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. जर शेतकऱ्यास याबाबत तक्रार असल्या कृषी अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे लेखी तक्रार करू शकतात. चौकशी समितीस माहिती देण्यासाठी तयारी - १) शेतकऱ्यांनी पेरणीची तारीख, पेरणीची पद्धत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी किती बियाणे वापरले, पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर पावसाचे प्रमाण काय होते किंवा पिकास किती पाणी दिले, कोणत्या प्रकारे दिले, यापूर्वी कोणते पीक घेतले होते, नांगे भरण्यासाठी बी वापरले असल्यास कोणते बी वापरले आणि पीक संरक्षण केल्यास रोग, कीड नियंत्रणासाठी कोणते कीडनाशक वापरले या सर्व बारीक-सारीक गोष्टींची माहिती तयार ठेवावी. जेणेकरून चौकशी समितीस त्यांचे निर्णय घेणे सुलभ होते. २) बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त आहे, असा अहवाल प्राप्त झाल्यावर ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी सातबारा उताऱ्यावर नोंद, गाव पंचनामा, फोटोग्राफ, बियाणे खरेदीपासून ते काढणीपर्यंतच्या मशागतीचा प्रकार, पीक संरक्षण, रासायनिक खतांचा वापर व खर्चाचा सविस्तर तपशील असणे आवश्यक आहे. ३) शक्यतो बियाणे खरेदी पावती शेती ज्याच्या नावे असेल त्या शेतकऱ्यांच्या नावाने घ्यावी. पावतीवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव असावे. संपर्क - डॉ. विजय शेलार - ७५८८६०४२५२ (बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) |
भेंडीवरील शेंडा, फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ढगाळ वातावरणात दिसून येतो. ही कीड विविध मालव्हेशीअस कुळातील पर्यायी यजमान वनस्पती जसे कापूस, पेटारी, जास्वंद, हॉलीहॉक इ. वनस्पतीवर उपजीविका करते. नुकसानीचा प्रकार - किडीचा मादी पतंग पानावर, कळीवर, कोवळ्या फळांवर अाणि शेंड्यावर निळे अंडी घालतो. सुरवातीला अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळ्या शेंड्यावर छिद्र पाडून अात शिरते. त्यामुळे कोवळे शेंडे सुकून जातात. त्यानंतर अळी फळांना छिद्र पाडून अात शिरते व फळाच्या अातील भाग खाते. नियंत्रण व्यवस्थापन - - एकात्मिक कीड नियंत्रणावर भर द्यावा. प्रादुर्भावग्रस्त फळे, शेंडे, फुले, कळ्या, नियमितपणे वेचून मातीत पुरून नष्ट करावीत. - प्रति १० मीटर अंतरावर एक याप्रमाणे (हेक्टरी कमीत कमी १००) कामगंध सापळ्यांचा वापर करावा (सापळ्यात इरवीट ल्युरचा वापर करावा). त्यामुळे नर पतंग सामूहिकरीत्या आकर्षित होतात. कामगंध सापळ्यामध्ये आकर्षित नर पतंग नष्ट करावेत. - लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर मका, ज्वारी, बाजरीची पीकाभोवती दोन रांगेत लागवड करावी. त्यामुळे पतंगाला मूळ पिकामध्ये येण्यासाठी अडथळा निर्माण होतो. - ट्रायकोग्रामा चीलोनीस या अंड्यावरील परोपजीवी मित्रकीटकाचा वापर करावा. (प्रतिहेक्टरी दीड लाख अंडी) रासायनिक नियंत्रण -(नॅपसॅक पंपाद्वारे) फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट (५ एसजी) ०.३५ ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन (३० ईसी) ०.७५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि संपर्क - डॉ. संतोष केदार ९५४१०५६०६६ (कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद) |
कॅनोपी शंभर टक्के झाल्यानंतर रोगांचे नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. या काळात भुरीचा प्रादुर्भावही वाढत असतो. योग्य प्रकारे उपाययोजना केल्यास द्राक्षामध्ये उर्वरित अंशाची समस्या टाळतानाच पिकाचे संरक्षणही साधता येईल. डॉ. एस. डी. सावंत, डॉ. इंदू सावंत १०० टक्के कॅनॉपी झाल्यानंतरचे रोग नियंत्रण : सर्वसाधारणपणे फळांच्या सेटिंगनंतर पाऊस नसल्याने केवड्याचा धोका कमी असतो. पाऊस झाल्यास वातावरणातील आर्द्रता वाढते. थंडी सुरू झाल्यानंतर सकाळी दव पडू लागते. अशा स्थितीत घडावर उशिरा येणाऱ्या केवड्याचा (डाऊनी) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या वेळी शक्यतो बुरशीनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा. पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड किंवा फोसेटील ए. एल. हे फवारणीसाठी स्वतंत्रपणे वापरावे. बागेमध्ये जुन्या केवड्याचा प्रादुर्भाव असल्यास या बुरशीनाशकांचे प्रमाण ३ ते ४ ग्रॅम ठेवावे. बागेमध्ये जुना केवडा नसल्यास प्रतिबंधात्मक २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर फवारणीनेही केवड्याचे नियंत्रण मिळू शकते. भुरीच्या नियंत्रणासाठी छाटणीनंतरच्या ५० ते ६० दिवसांपर्यंत सल्फर (८० डब्ल्यूजी) १.५ ते २ ग्रॅम प्रतिलिटर किंवा डिनोकॅप २५ ते ३० मि.लि.प्रति १०० लिटर पाणी या आंतरप्रवाही नसलेल्या बुरशीनाशकांचा वापर जरूर करावा. अशा वापराने ट्रायअझोल गटातील बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली भुरीची बुरशी नियंत्रणात आणता येते. बागेत यापुढेही प्रतिकारशक्ती असलेल्या भुरीच्या बुरशीच्या वाढीस आळा बसतो. डिनोकॅप किंवा सल्फरच्या फवारणीनंतर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगल्या प्रमाणात मिळू शकते. कायटोसॅनच्या फवारणीने पानावर त्यातील घटकाचे सूक्ष्म वलय निर्माण होते. त्यामुळे पानाच्या किंवा मण्याच्या पृष्ठभागावर वाढणाऱ्या भुरीला अडथळा निर्माण होतो. बुरशीनाशकाच्या फवारणींनतर लगेच कायटोसॅन फवारले असल्यास पाऊस किंवा मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या दवामुळे पानावरील बुरशीनाशक धुऊन जात नाही. त्यामुळे बुरशीनाशकाची नियंत्रणक्षमता जास्त वेळ चांगली राहते. कायटाेसॅन वेलीमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढविते. त्यामुळे भुरीची वाढ वेेगाने होत नाही. कायटोसनच्या वलयामध्ये जैविक नियंत्रणासाठी वापरलेले ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटीलस किंवा सुडोमोनास फ्लुरोसन्स हे घटक चांगल्याप्रकारे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे पुढील कुठल्याही वाढीच्या अवस्थेमध्ये जैविक नियंत्रणासाठी फवारणी घेण्याचे नियोजन असल्यास त्या आधी कायटोसॅनची फवारणी जरूर घ्यावी. बुरशीनाशकांचा योग्य वापर अाणि उर्वरित अंश समस्या : छाढणीनंतरच्या ६० ते ८० दिवसांपर्यंतच्या काळात भुरीचा धोका अधिक असलेल्या वेळी फवारणी घ्यावी. ढगाळ वातावरण व वातावरणातील तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्यास भुरीचे बिजाणू वेगाने तयार होतात. बागेमध्ये भुरी वेगाने पसरते. साहजिकच अशा वातावरणामध्ये फवारणी घ्यावी. - जास्त थंडी नसल्यास सल्फर फायदेशीर ठरू शकेल. - थंडी वाढल्यास ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके उदा. टेट्राकोनॅझोल (३.८ इडब्ल्यू ) ०.७५ मि.लि. प्रतिलिटर किंवा मायकोब्युटानील (१० डब्ल्यूपी) ०.४ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारल्यास नियंत्रण चांगले मिळते. छाटणीनंतर ८० दिवसांनंतर फवारलेल्या कुठल्याही बुरशीनाशकाचे उर्वरित अंश काढणीपर्यंत घडामध्ये राहू शकतात. म्हणून छाटणीनंतर ८० दिवसांनंतर कुठल्याही ट्रायअझोल बुरशीनाशकाचा वापर भुरी नियंत्रणासाठी टाळावा. - प्रत्येक बुरशीनाशकाचा पीएचआय बघूनच वापर केल्यास त्याचे उर्वरित अंश एमआरएलपेक्षा कमी निश्चितच येतील. थंडी वाढत असताना... या वर्षी नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वच द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाढत्या फुटीवर रोगाचे नियंत्रण फक्त बुरशीनाशकाने मिळणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर कायटोसॅनचा वापर करून पावसाच्या दिवसात त्यावर ट्रायकोडर्मा किंवा स्युडोमोनास फ्लुरोसन्स किंवा बॅसिलस सबटिलिस यांसारख्या जैविक घटकांसाठी उपयोगी असे सूक्ष्मजीव घटक फवारावेत. त्यामुळे केवळ बुरशीनाशकाने मिळणाऱ्या नियंत्रणापेक्षा या पध्दतीने चांगले रोगनियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सर्व विभागामध्ये हलक्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्या वेळी सकाळी धुके व दव पडण्याची शक्यता आहे. जर बागेतील तापमान दहा अंशांपेक्षा कमी जात असेल तर डाऊनी वाढण्याची शक्यता फार कमी असेल, त्याबरोबर भुरी वाढण्याची शक्यता वाढेल. ॲम्पेलोमायसिस क्विस्कॅलिस ही भुरीच्या बुरशीवर वाढणारी बुरशी आहे. थंडीच्या दिवसामध्ये भुरी वाढल्यास या बुरशीजन्य घटकाची फवारणी २ ते ५ मिली याप्रमाणे बागेत केल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. काढणी आधी शेवटच्या तीस ते चाळीस दिवसांमध्ये बागेमध्ये शक्यतो कोणत्याही बुरशीनाशकांचा वापर करू नका. बागेमध्ये रोग दिसल्यास शक्यतो जैविक नियंत्रणाच्या बुरशी (ट्रायकोडर्मा) किंवा जिवाणूजन्य घटक उदा. बॅसिलिस सबटिलिस यांची फवारणी करावी. अशा फवारणीने मण्यावर व घडावरील भुरीचे नियंत्रण चांगल्या रीतीने होईलच, त्याच बरोबर काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढेल. |
सिंचन व्यवस्थापन- - ठिबक सिंचन संच असल्यास, त्याच्या नळ्या पसराव्यात. ठिबक सिंचनपद्धतीत पाणी देण्यासाठी तोट्या (ड्रिपर) किंवा सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) वापरतात. पाणी सर्वदूर समप्रमाणात देण्यासाठी साध्या तोट्याऐवजी दाब नियमक तोट्यांचा वापर खर्चिक असला, तरी अंतिमतः फायदेशीर ठरतो. यामुळे पाण्याचा दाब ९० ते ९५ टक्के सारखा राखला जातो. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. जमिनीची मशागत आणि निंदणी करावी. पाण्याची गरज - वय (वर्षे) --- पाणी (प्रतिदिवस प्रतिझाड) - संत्रा व मोसंबी - एक --- ९ लिटर चार --- ४० लिटर आठ --- १०५ लिटर दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक --- १३१ लिटर लिंबू - एक --- ६ लिटर चार --- १९ लिटर आठ --- ५७ लिटर दहा व त्यापेक्षा अधिक --- ९२ लिटर. मृग बहराचे फळ व्यवस्थापन - - फळगळ कमी करण्याकरिता, २, ४-डी दीड ग्रॅम किंवा जिब्रेलिक आम्ल दीड ग्रॅम अधिक कॉर्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) १०० ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. - मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, एक ग्रॅम जिब्रेलिक आम्ल अधिक माेनोपोटॅशिअम फॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेट (२ टक्के) २ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने फवारावे. रोग व्यवस्थापन - - फायटोफ्थोरा ग्रस्त झाडावर, मॅन्कोझेब अधिक मेटॅलॅक्झिल एम (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील अल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. उर्वरित द्रावण झाडाभोवतीही टाकावे. - झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. त्यासाठी १ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून बोर्डोपेस्ट करावी. कीड व्यवस्थापन - या महिन्यात पिकलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव असतो. अर्धा मि.ली. मिथाईल युजेनाल आणि अर्धा मिली मॅलाथिऑनचे मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीमध्ये ठेवावे. नरमाशा त्याकडे आकर्षित होऊन त्यास बळी पडतात. फळ तोडणीच्या ६० दिवसांपूर्वीपासूनच या मिश्रणाच्या २५ बाटल्या प्रतिहेक्टर क्षेत्र याप्रमाणे बागेत ठेवाव्यात. यातील कीटकनाशकाचे द्रावण दर ३० दिवसांनी बदलावे. - कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी) डायकोफॉल २ मि.ली. किंवा इथिऑन २ मि.ली. किंवा प्रोपरगाइट १ मि.ली. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. डॉ. दिनकरनाथ गर्ग, ९८२२३६९०३० ०७२५-२५००३२५ (केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर) |
सध्याच्या काळात हळदीवर कंद किंवा मूळकूज, पानांवरील ठिपके आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. यामुळे झाडातील हिरवेपणा कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत. डॉ. चारुदत्त ठिपसे कंदकूज किंवा मूळकूज - - रोगग्रस्त कंदापासून या रोगाचा प्रसार होतो. प्रादुर्भावामुळे पानाच्या कडा वाळण्यास सुरवात होते. कालांतराने पूर्ण पान वाळते. - झाडाचा बुंधा ओलसर होऊन नरम पडतो आणि झाड कोलमडते. खोडाचा घाण वास येतो. खोड दाबल्यास त्यातून पाणी बाहेर पडते. - रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कंदावरदेखील बुरशीची वाढ होते, कंद कुजतो. नियंत्रणाचे उपाय - - शेतामध्ये पाणी साचू देऊ नये. - कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा - एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण तयार करावे. (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद आणि १०० लिटर पाणी). त्यातील १०० ते १५० मि.लि. द्रावण रोगग्रस्त भागातील हळदीच्या रोपाच्या मुळाजवळ जिरवावे. पानांवरील ठिपके - - कोलेटोट्रिकम कॅप्सिसी या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव. ओलसर व दमट हवामान रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत. - पानाच्या दोन्ही बाजूंस करडे वलय असलेले व मध्यमभागी राखाडी रंगाचे लांबट ठिपके दिसतात. कालांतराने दोन किंवा अधिक ठिपके एकत्र येऊन मोठे चट्टे पडतात. ठिपक्यांचा मध्यभाग पातळ होतो. पान वाळण्यास सुरवात होते. - जास्त प्रादुर्भाव असल्यास बुंधा आणि कंदावर ठिपके दिसून येतात. काळ्या रंगाची बुरशी आढळून येते. नियंत्रणाचे उपाय - - मॅंन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी. - रोगाचा पुढील प्रसार टाळण्याकरिता रोगग्रस्त झाडाची पाने गोळा करून जाळून टाकावीत. ३) पानांवरील करपा (लीफ ब्लॉच) - - टॅफरिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील वाढती आर्द्रता आणि २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान रोगाच्या प्रसारास पोषक. - एक ते दोन मि.मी. आकाराचे चौकोनी ठिपके एका रांगेत पानांच्या शिरांच्या बाजूने पानांच्या दोन्ही बाजूस आढळतात. पानाच्या वरच्या बाजूस ठिपक्यांचे प्रमाण जास्त असते. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे मोठे डाग पानांवर पडतात. - या पानांवर असलेल्या बुरशीबीजांपासून नवीन पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. नव्या पानांवरील दुय्यम प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. या रोगाचे बीजाणू वाळलेल्या पानांमध्ये पुढील हंगामापर्यंत जिवंत राहतात. नियंत्रणाचे उपाय - - मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी. - रोगाचा पुढील प्रसार टाळण्याकरिता रोगग्रस्त झाडाची पाने गोळा करून जाळून टाकावीत. - कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी. संपर्क - डॉ. चारूदत्त ठिपसे - ८२७५४१२०६२ (विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, अकोला) |